गोर बंजारा साहित्य " गोरमाटी बोलीभाषेचे सामाजिक आविष्कार आणि लोकजीवन.. भिमणीपुत्र मोहन नायक #Gor _Banjara _Book " #Gormati_Bolibhasheche Samajik Avishkar &Lokjivan.. Bhimniputra Mohan Nayak

गोर बंजारा साहित्य 

गोरमाटी बोलीभाषेचे सामाजिक आविष्कार आणि लोकजीवन 

 ......................... भीमणीपुत्र मोहन गणुजी नायक

                 गोरमाटी बोलीभाषेला ‌राजभाषेचा दर्जा मिळावा म्हणून गोरगणातील अनेक विचारवंत, साहित्यिक अहोरात्र मेहनत घेत आहेत. राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान, मुख्यमंत्री, साहित्य मंडळ यांच्यासोबत पत्रव्यवहार करून " गोरबोली" ला राजभाषेचा दर्जा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

         मानवाच्या विकास अवस्थेत एकमेकांशी संप्रेषण करताना विविध स्वर, आवाज हेच प्रमुख साधन होते. जसजशी मानव विकास अवस्थेत पोहचला. तसा त्याने स्वत:ला स्वनिम रुप प्रदान केले. त्यामधून अनेकविध भाषांचा जन्म झाला. रानटी अवस्थेतून आलेली स्वर संकेताची भाषा नागरी अवस्थेत संस्कारीत होवून सभ्य भाषा बनली. राजकीय, सामाजिक संरक्षण लाभल्याने नागरी भाषा विकसीत पावली. परंतु बोलीभाषा हळूहळू ऱ्हास होत गेली. जगाच्या पाठीवर अस्तित्वात असलेल्या अनेक मुळ बोली भाषा लिपीबद्ध न झाल्याने संपुष्टात आल्यात. बोलीभाषा दैनंदिन भाषा व्यवहारात वापरताना मागासपणाचे लक्षण समजून आपल्याच लोकांनी आपली बोली नेस्तनाबूत केली आहे. हजारो वर्षांपासून तग धरून असलेल्या अनेक बोलीभाषा मागील पन्नास - साठ वर्षांत आधूनिकीकरनाच्या नावाखाली नष्ट झालेल्या आहेत. 

         ' गोरमाटी '... बोलीभाषा अशीच आदिम काळापासून आपले अस्तित्व टिकवून आहे. आधूनिकीकरनाच्या नावाखाली तिची पण गळचेपी झालीच. परंतु गोरमाटी बोलीभाषा जीवंत रहावी म्हणून अनेक विचारवंत, साहित्यिक अहोरात्र झटत आहेत. त्याचीच परिणीती म्हणून काळाच्या पडद्यावर पुन्हा नव्याने भरारी गोरमाटी बोलीभाषा घेत आहे.

          गोरमाटी... बोलीभाषा पुनर्जीवित करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या अनेक विचारवंत, साहित्यिकात अग्रगण्य नाव.

          ............................... भिमणीपुत्र मोहन नायक

          बोलीभाषेत व्याकरण आणि भाषा विज्ञान यांना कोणत्याही प्रकारचे स्थान नाही असे मत मांडल्या जाते. या मताचे खंडन करीत.. भिमणीपुत्र यांनी भाषाविज्ञानाचा सांगोपांग विचार करुन गोर बोलीभाषा सुद्धा कोणत्याही अंगाने इतर प्रमाणभाषेपेक्षा तसूभरही कमी नाही हे सप्रमाण सिद्ध केले आहे. गोरमाटी समूह आणि त्याची गोर बोली यांची उत्पत्ती चा सिद्धांत भिमणीपुत्र यांनी...... 

          ... गोरमाटी बोलीभाषेचे सामाजिक आविष्कार आणि लोकजीवन...... या ग्रंथात केला आहे.

          गोरमाटी समाज त्याची उत्पती, विकास आणि जगभर झालेला प्रसार याचा विचार पहिल्या प्रकरणात भीमणीपुत्र यांनी मांडला आहे. 

#Gor#banjara#book #गोर बंजारा संस्कृती 

     गोरमाटी कोण?

           ज्यांची याडीभाषा ( मातृभाषा) गोरबोली तो गोरमाटी. भारतात सुमारे १२ कोटी तर युरोप, अमेरिका खंडात जवळपास २० कोटी लोकसंख्या गोरमाटी बोलीभाषा बोलणाऱ्याची आहे... असे मत मिलिंद किर्ती इतिहास अभ्यासक यांचे आहे. जगभरात पसरलेला हा समाज सिंधू संस्कृतीतील पणीचे वंशज असल्याचे अनेक इतिहासकारांनी सांगितले आहे. उत्खननात सापडलेल्या अनेक वस्तूंची गोर संस्कृतीच्या वस्तू सोबत साधर्म्य आढळते हे एक प्रमुख कारण. 

           २७ नावांनी गोरगण भारतात ओळखल्या जातो. गोर म्हणजे शासनकर्ते हा अरबी भाषेतील अर्थ आहे. बंजारा हे नाम गोर गणाला मुघल काळापासून जास्त प्रचलित झाले. " गोर बंजारा गणाची  नसाब, हासाब, मळावं या गणपंचायतीमुळे स्वयशासित समाजरचना स्पष्ट होते." नाव, संस्कार, परंपरा यांमध्ये आढळणाऱ्या साधर्म्यामुळे हा समाज अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात आहे हे सिद्ध होते. गोरमाटी बोलीभाषा आणि भाषा विज्ञान यांची सांगड कशाप्रकारे घालता येईल याचा उहापोह ग्रंथकर्त्याने .....

          गोरबोलीच्या सहवासातून भाषाविज्ञानाकडे ... या प्रकरणात केला आहे

              गोर बोलीचे स्वतंत्र अस्तित्व आहे. युवापिढीने त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. सामू, हेट, ढींया, पेना, ताणू, पच्, लारं, हुंड्याग, वडी, तोती, सारु.... इत्यादी शब्दयोगी अव्यय.., विशेषणे, क्रियाविशेषण, क्रियापदे आदिंचा व्याकरण दृष्टीने विचार केला तर गोरमाटी बोलीभाषा परीपुर्ण आहे.

             देशात २३ विद्यापीठात भाषा विज्ञान आणि भाषा अध्ययन विभाग कार्यरत. परंतु कोणीही गोरमाटी बोलीभाषेकरीता अभ्यासगट नेमला नाही. ही शोकांतिका आहे. असे रोखठोकपणे विचार लेखकाने मांडले आहे. 

             वाग् यंत्रणा सर्व भाषिकांची सारखी असली तरी जीभ, कागला ( पडजीभ), कोबली ( स्वरतंत्री), टिटवा ( कंठद्वार), चोखो ( घसा) हि ध्वनी निर्मिती अवयवांची नावे अन्य कोणत्याही भाषेत आढळून येत नाही. स्वन... ध्वनी (आवाज) साठी ढाळ हा शब्द पण गोरबोलीत एकमेवाद्वितीय आहे.

             रस, अलंकार आणि व्याकरण दृष्टीने गोरबोली समृद्ध आहे. डावोडुंगर, डायीसाणी, डावोधरांवू, ..... यासारखे अलंकारिक शब्दांची गोरबोलीत भरमार आहे.    

      गोरमाटी बोलीभाषा:- उत्पत्ती सिद्धांत

             कोकीळा हे नाव त्याच्या.. कुकू.. ध्वनीवरून पडले असावे. जगातील अनेक भाषांत या नावाशी साम्य असणारी नावे आहेत. गोरबोलीत... कोबल.. म्हणतात. सोबतच मानवी स्वरतंत्री ला कोबली असे नाव रुढ आहे. याप्रमाणे जगातील कोणत्याही भाषेत आढळून येत नाही.

             याडी... माता हा भाषा निर्मिती प्रवासातील पहिला ध्वनी उच्चार. इतर भाषेतील माता शब्दाचा संबंध एकमेकांशी येतो. परंतु गोर बोलीतील याडी शब्दांशी साधर्म्य बाळगणारा दूसरा शब्द इतर भाषेत शोधूनही सापडणार नाही.

             बोलीभाषा ज्या प्रांतात बोलल्या जाते त्यावरून त्याची ओळख होते. मगधची मागधी, वऱ्हाड ची वऱ्हाडी, वज्रभूमीची वज्र याला गोरबोली पण अपवाद नाही. अफगाणिस्तानातील गोर प्रांतातील गोर म्हणून गोरबोली शब्द रूढ झाला हि शक्यता नाकारता येत नाही.

    गोरमाटी बोलीभाषा व्यवहार आणि स्वरूप

            भाषेचे संप्रेषण आणि संक्रमण योग्यरीत्या व्हावे म्हणून 'नातरो ओळंग' यात अर्धगोलाकार पद्धतीने उभे राहणे व ' मळाव, हासाब, नसाब' या गोलाकार पद्धतीने बसण्याची पद्धत. अनुकरणातून श्रवण व आकलन यात अंतर पडू नये हा उद्देश असावा. भाषा संप्रेषणाचे नानाविध प्रकार गोरबोलीत अस्तित्वात आहेत. ध्वनी संप्रेषण, अनुकरणात्मक संप्रेषण, देहबोली संप्रेषण, संगीत संप्रेषण, कलात्मक संप्रेषण इत्यादी माध्यम भाषा व्यवहार होताना दिसतात.

       शिष्टाचारातील अभिव्यक्तीचे सामाजिक संकेत

            सामाजिक व्यवहारात गोरमाटी बोलीभाषेतही काही सामाजिक संकेत पाळले जातात. पती पत्नी, लहान मोठे, तथा बरोबरीचे पुरुष वा स्त्रिया एकमेकांशी बोलताना, संवाद साधताना नाव न घेता सांकेतिक शब्द वापरून अभिव्यक्त होतात. 

           प्रत्येक भाषेची एक ठेवण, लकब असते. त्यातही लिंगपरत्वे त्यात भिन्नता आढळून येते. पुल्लिंगी भाषा व्यवहारात " र्" तर स्त्रिलींगी भाषा व्यवहारात " य" हा वर्ण लिंगभेद स्पष्ट करतो. आरे, आये, कसो रे, कस छ ये.. आदी.

           अभ्यस्त, अंशाभ्यस्त शब्दांची भरमार आहेच. पण वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे लिंगभेदान्वये भाषा व्यवहारात सर्वनाम आणि सार्वनामिक विशेषणे बदलत नाही. संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे. हे जे सर्वश्रृत आहे. हे धादांत खोटे आहे. भाषा ही जनसमुहाची असते. संस्कृत बोलणारा आजतागायत कोणताही समुदाय अस्तित्वात नाही. भाषा अभ्यासकांच्या मते संस्कृत भाषा ही आर्य आणि मुळनिवासी यांच्या भाषासंकरातून निर्माण झाली आहे.

           ध्वनी, उच्चार प्रक्रिया

           ध्वनी करीता ' ढाळ' हा स्वतंत्र शब्द. गोरबोलीत " ए, औ, क्ष, ज्ञ, व, ष, त्र " हे ध्वनी उच्चार आढळत नाहीत. वर्ण विचारांमध्ये स्वर, व्यंजन, अनुनासिक, महाप्राण, अर्धस्वर यांची माहिती दिली आहे. सोबतच वर्णाच्या उच्चार स्थानावरून कंठ्य, दंत्य, तालव्य, मूर्धन्य, ओष्ठ्य इत्यादी प्रकारात विभागणी करून दिली आहे.गोरमाटी भाषा वैशिष्ट्य म्हणजे ऱ्हस्व आणि दीर्घ आशयभेद उच्चारण आढळत नाही.

           ध्वनी परिवर्तन

          " हिंदूस्थानातील विविध भाषा ह्या संस्कृत भाषेतून निर्माण झाल्याचे समजणे मुर्खपणाचे आहे "... हे प्र.रा. देशमुख यांचे मत आहे. लिखीत साहित्य खरे आणि मौखिक साहित्य खोटे ठरविणे मौखिक साहित्याची चेष्टा करण्यासारखे होईल. आजही बोलीभाषेतील अनेक शब्दांना संस्कृत भाषेत पर्यायी शब्द सापडत नाही.      

           अर्थविचार

           रुपिम विचार

           अर्थपूर्ण स्वनिमसमूह म्हणजे रुपिम होय. यालाच शब्द असे म्हणतात. गोरमाटी बोलीभाषेत शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, विभक्ती, प्रत्यय इत्यादी इतर भाषेप्रमाणे रुपिम मोठ्या प्रमाणात आढळतात.

           लोकसाहित्य

           पुरुषांची साहित्यरचना..... साकी, साकतर, दोयरा, सिकवाडी, कसळात, वाजणा, टेर, लेंगी

           स्त्री रचित साहित्य..... हावेली, ढावलो, मळणो, नातरो, ओळंग, हिंजोळो, घटीपरेर गीद, तीजेर गीद...... आदी

           छोरी छच्यारेर ( मुली - मुलांचे) साहित्य... साळसुके, हाळ्याभोळ्या, हाडेल हाप्प,.... आदी

           अशा भाषिक व्यवहाराने समृद्ध असलेली गोरबोली. व्याकरण दृष्टा कोठेही कमी नाही. याबाबत सबळ पुरावा सदरील पुस्तकात लेखकाने प्रस्तुत केला आहे. बोलीभाषा आणि त्यांच्या व्याकरणाचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ग्रंथ. 

किशोर आत्माराम नायक

गोर बंजारा संस्कृती

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोर बंजारा समाज आणि देवीदेवता.. १ Gor Banjara God & Goddess

गोर बंजारा समाज गोत्र.. गोत (पाडा)..‌‌२ Gor Banjara Gotra, Got (pada)

बंजारानामा..... नजीर अकबराबादी #Banjaranama #Nazir_Akbarabadi

गोर बंजारा समाज गोत्र .... गोत पाडा.. १ Gor Banjara Gotra, Got (pada)

गोर बंजारा समाज पुजाविधान.४.. गोटपुजा #Gor #Banjara's #worship method ' #GOTPUJA '

गोर बंजारा समाजव्यवस्था " तांडा" Gor Banjara Social system ' TANDA'

गोर बंजारा समाज आणि देवीदेवता ...२ Gor Banjara God & Goddess