गोर बंजारा तांडा संघटन " कारभारी" Gor Banjara Tanda system " KARBHARI"

गोर बंजारा तांडा संघटन 

कारभारी 

              " कारभारी " नायकाला तांडा कार्यात मदत करणारी प्रमुख व्यक्‍ती म्हणजे कारभारी असतो. नायकाच्या निर्णयाची पाठराखण व अंमलबजावणी करणे ही त्याची कर्तव्ये होय. आदर्श कारभारी आदर्श नायकाइतका सन्मान्य गणला जाऊ शकतो. " कारभारी " हा नायकाच्या अनुपस्थितीत तांडा व्यवस्था सांभाळण्याचे कार्य करीत असतो. कारभारीचे वर्तन, व्यवहार यामुळे तांड्यातील प्रभावी व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होते. काही तांड्यात तर कारभारी आपल्या दैनंदिन जीवनातील वागणूकीमुळे नायकापेक्षा सरस ठरतो. तांड्यातील सर्व बाबींचे नियंत्रण व नियमन करण्याची जबाबदारी प्रामुख्याने " कारभारी" च करत असतो. नायकाने घेतलेला निर्णय कार्यान्वित करण्यासाठी कारभारी सर्वतोपरी प्रयत्न करीत असतो. सामान्यतः नायकाने म्हणजेच पंचमंडळाच्या निर्णायाची अवहेलना "तांडा" सहसा करीत नाही. 

कारभारी निवड

          " कारभारी " हे पद तांड्यामध्ये नायकाप्रमाणेच वंशपरंपरागत नेमल्या जाते. कारभारीचा मृत्यू झाला तर त्याच्या मुलांपैकी सर्वात वडील मुलगा किंवा जो तो पद सांभाळण्याचा लायकीचा असेल त्याला दिले जाते. " कारभारी " जर निसंतान असेल तर त्याच्याच गोत पाड्यातील प्रभावी, लायक व्यक्तीकडे सोपविल्या जाते. अशावेळी तांडा सर्वानुमते निर्णय घेत असतो.‌ एकदा नायक वा कारभारीची निवड झाल्यानंतर ते मृत्यूपर्यंत त्या पदावर कायम रहातात. नायक वा कारभारीला पदभ्रष्ट करण्याविषयी तांड्याने कोणत्याही प्रकारचे नीतीनियम ठरविलेले नाही. 

गोर बंजारा तांडा संघटन " कारभारी"
कारभारी

         नायकाच्या तांड्यातील रयत किंवा आसामीने नायकाचे निर्णय मानणे बंधनकारक असते. पंचमंडळाने घेतलेले कोणतेही निर्णय हा नायकाचा निर्णय मानला जातो. काही कारणास्तव ' नायक व कारभारी ' यांच्या निर्णय, वर्तन, व्यवहाराला कंटाळून काही असामी ( प्रतिष्ठीत व्यक्ती) तांड्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतात. नवीन " तांडा" तयार करतात. अशावेळी ' नायक व कारभारी ' यांची बहिर्विवाही गोत्रातून निवड करण्यात येते. सर्वसमावेशक, प्रभावी, लायक अशाच व्यक्ती ला तांडा मान्यता देत असतो.

    " कारभारी " कार्य कर्तव्य

        नायकाचा विश्वासू सहकारी म्हणून काम करणे. तांड्यात होणाऱ्या शुभ प्रसंगी नायकासोबत, वा नायकाच्या वतीने कार्यात सहभागी होणे. दोन गटांतील वादविवादात नायकाला योग्य सल्ला व मार्गदर्शन देणे. " समनक, गेर, ओरी- बकरी" च्या कार्यक्रमाचे योग्य नियोजन करणे. " नसाब" च्या वेळी दोन्ही गटाची बाजू विचारपूर्वक ऐकणे. सल्लामसलत करून योग्य तो निर्णय घेण्यात नायकाला मदत करणे. तांड्यात उद्भवणाऱ्या अडीअडचणी, समस्यांबाबत नायकाला अवगत करणे. विवाह प्रसंगी तांड्यात येणाऱ्या वरपक्षाची योग्य व्यवस्था करणे. येणाऱ्या वरपक्षाकडून तांड्याचा " हासाब" घेणे.‌ यासारखी अनेक कामाची जबाबदारी नायकासोबत कारभारी ला पण पुर्ण पाडावी लागते. 

        याच कारणामुळे " तांडा " जेवढा नायकाच्या नावाने ओळखल्या जातो. तेवढाच " कारभारी" च्या नावाने सुद्धा. 

        सद्यस्थितीत " तांडा" दोलायमान स्थितीत पोहचला आहे. " तांडा " तांडा राहीला नसून तो गावाचा, नगराचाच एक भाग झाला आहे. प्राचीन प्रथा परंपरा न पाळणारी पिढी निर्माण झाली आहे. तांड्यातील सर्व पेच तांड्यातच सुटत असे पण आताच्या काळात तांडा न्यायालयाचा उंबरठ्यावर पोहचला आहे. पुन्हा तांडा जिवंत करायचा असेल तर नव्या जुन्याचा योग्य मेळ घालावा लागेल. तरच तांड्याला गतवैभव प्राप्त होवू शकते.

आपली प्रतिक्रिया  (comment)अवश्य नोंदवा . #Banjara

        किशोर आत्माराम नायक

        गोर बंजारा संस्कृती 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोर बंजारा समाज आणि देवीदेवता.. १ Gor Banjara God & Goddess

गोर बंजारा समाज गोत्र.. गोत (पाडा)..‌‌२ Gor Banjara Gotra, Got (pada)

बंजारानामा..... नजीर अकबराबादी #Banjaranama #Nazir_Akbarabadi

गोर बंजारा समाज गोत्र .... गोत पाडा.. १ Gor Banjara Gotra, Got (pada)

गोर बंजारा समाज पुजाविधान.४.. गोटपुजा #Gor #Banjara's #worship method ' #GOTPUJA '

गोर बंजारा समाजव्यवस्था " तांडा" Gor Banjara Social system ' TANDA'

गोर बंजारा समाज आणि देवीदेवता ...२ Gor Banjara God & Goddess