गोर बंजारा समाज आणि देवीदेवता.. १ Gor Banjara God & Goddess

 गोर बंजारा समाज आणि देवीदेवता

        प्रत्येक व्यक्ती, समुह कोणत्या ना कोणत्या शक्तीची उपासना करीत असतोच. निसर्गात घडणाऱ्या चांगल्या -वाईट घटनेला दैवी चमत्कार मानण्याची वृत्ती पुर्वापार चालत आलेली आहे. निसर्गाच्या या अद्भुत, अनाकलनीय घटना कोणती तरी शक्ती नियंत्रित करते हि भावन मानवाच्या मनात उत्पन्न झाली. या अद्भुत, अगम्य शक्तीला आपल्या अनुकूल करण्यासाठी मानवाने भिन्न भिन्न प्रकारे त्याची आराधना सुरू केली.

        गोर बंजारा गणसमाज हा सुद्धा  या विषयापासून वेगळा नाही. निसर्गाच्या या अद्भुत शक्तीला गोर गण " मऱ्यामा " असे म्हणतो. साऱ्या विश्वाची नियती नियंत्रित करणारी आदिमाया होय. सप्तमातृक अशा सात देवी गोर बंजारा गणात पुजल्या जातात. मातृशक्ती पुजक गोर बंजारागणाच्या  देवींची नावे- १. मर्‍यामा २. मथराल ३. तळजा ४ कंकाळी ५. सितळा ६. सती ७. हिंगळाज अशी होय. या सगळ्या मातृदेवता होत. प्रत्येक कुळाने आपापल्या परीने आपल्या कुलदेवता म्हणून वेगवेगळ्या रुपात पुजा, आराधना करणे सुरू केले आहे.

१)मऱ्यामा (आदिमाया)

               संपूर्ण बंजारा गणाने भावभक्तीने मानलेली अशी त्यांची मुख्य देवता म्हणजे " मर्‍यामा " ही होय. मर्‍यामा या देवतेचा सर्वांगरूपाचा विचार करता नागर जीवनात रूढ असलेल्या ‘मरीमाय’ या देवतेपेक्षा ती सर्वार्थाने भिन्न आहे. असे आढळून येते हे सर्वप्रथमच सांगणे अगत्याचे आहे. कारण नाम सादृश्यामुळे असे समजण्याचा घोटाळा अनेक लोक करीत असतात. ‘मर्‍यामा’ ही देवता आत्यंतिक स्वरूपाची सुष्ट आणि दुष्टही आहे. ती एकदा प्रसन्न झाली तर स्वर्ग, मृत्यू, पाताळातील कोणताही लौकिक व अलौकिक अप्राप्य वस्तू सुख प्राप्त होऊ शकते. सर्व संकटाचे हरण निवारण करून ती इडापिडा दूर करते. तिच्या कृपेने भविष्यातील घटनेची आगाऊ माहिती होऊ शकते. थोडक्यात ‘मर्‍यामा याडी’ (याडी - आई) प्रसन्न झाली तर मनुष्याचे कोटकल्याण करून त्याच्या सर्व मनोकामना ती पूर्ण करते. या उलट तिच्या कोपामुळे रोग पिडा उद्भवू शकतात. ती कोपली ती सर्व संपत्तीचा सर्वनाश करून अपरिमित दारिद्य्र भोगावयास लावते. संकटावर संकटे येऊ शकतात. गायी-गुरे आदी पशुधनाचा नाश होतो. सुख लोपतात, राख रांगोळी होते. विश्व नियंत्रणाचे काम करणार्‍या सर्व निसर्ग शक्‍ती (हिंदुंची पंचमहाभूते) व सर्व देवता या ‘याडी मर्‍यामा ’ च्या अंकित असून तिच्या एकटीच्या पूजेमुळे, उपासनेमुळे त्या सर्वशक्‍ती प्रसन्न होतात व मनोरथ सिद्ध करतात अशी कल्पना आहे. समूहावर ‘मर्‍यामा’ कोपली तर अनेक साथीचे रोग येतात. विशेषतः देवी व महामारी (कॉलरा) हे रोग या देवतेच्या कोपाचेच द्योतक आहे असे ठामपणे समजले जाते. व्यक्‍ती प्रमाणेच ही देवता समूहावर सुद्धा कृपा करू शकते. ती समूहावर प्रसन्नली तर समूहाला सर्व तर्‍हेचे लौकिक विजय समृद्धी व सुख देऊ शकते. तांडा सुखी ठेवते.

                मर्‍यामा, सगुणा, विराटण, मावली, आई, झापावाली, सुरावाली, माया सगळती ही तिची बंजारा बोलीतील (बंजार्‍यांना प्रिय) अशी काही संबोधन आहेत. 

                तिची पूजा, व्रत, उपासना कधीही निष्फळ होत नाही, असे मानतात. मर्‍यामा देवी विषयीच्या वरील कल्पना तिच्या एकूण अस्तित्वाला अगम्य, अलौकिक व सर्व शक्‍तीयुक्‍त मानणार्‍या आहेत. 

गोर बंजारा देवी देवता

      २) मतराल (मथराल)

                गायी-गुरांवर येणार्‍या साथीच्या रोगाचे संकट निवारणारी अलौकिक, अगम्य शक्‍ती म्हणून मृतपूर्वजांचे आत्मे- भूत-प्रेत, यानंतर बंजारा गणाने मातृदेवतांचा स्वीकार केलेला आढळून येतो. ‘मथराल’ ही पशूसंपत्तीचे रक्षण व संवर्धन करणारी सुष्ट देवता, या कारणामुळे सर्वत्र पूजल्या जात असे. मात्र तिची पूजा देखील प्राथमिक अवस्थेत जादू विद्येच्या सहाय्याने संतुष्ट करून घेण्याच्या पद्धतीची असावी असे मथराल-मतराल- (मतर-मंतरणारे मंत्र) मंतरल्याने सिद्धी देणारी-पावणारी देवता या नामरूपावरून वाटते. गायी-गुरानंतर संतान देणारी, बालकांचे संवर्धन, संगोपन व रक्षण करणारी आणि संपत्ती वृद्धींगत करणारी देखील म्हणजे थोडक्यात बहुफल देणारी सुष्ट देवता म्हणून मान्यता पावलेली आहे. ‘

३)मेंकाळी (जरीमरी)

           हि एक  देवता  गोर बंजारा गण सामूहिकपणे पूजतात. महाकालीचे हे प्राकृत रूप आहे. सामुहिकपणे-पुजायची आणखी एक देवता म्हणजे ‘जरीमरी’ जरीमरी मातृदेवतेच्या गुणापैकी आहेत असे मानल्या जाते. मेंकाळी व जरीमरी या सुष्ट व दुष्ट अशा दोन्ही स्वरूपातील देवता असल्याची कल्पना आहे.

४) शिव पूजा 

            अत्यंत प्राकृत रूपाची असून आता तर ती लुप्तप्राय झालेली आढळते. तसे पाहता सर्वच आदिवासी जमात या शिव पूजक आहेत. शिव ही आदिवासी देवताच आहे. असे मान्यवर संशोधकही मानतात. गोर बंजार्‍याच्या शिव पूजेला एक वेगळा संदर्भ आहे आणि तो मौलिक आहे. बंजारा-लमाण गण हा आदिम काळापासून भटका गण आहे. तो रानोमाळ भटकत व्यापार उदिम करायचा. हे ही सर्वश्रूतच आहे. त्याच्या शिव देवता किंवा शिवलिंगाकडे पहावयाच्या दृष्टीला केवळ पूजनीयतेचेच नव्हे तर भौगोलिक महत्त्वाचे कारण होते. तो असा की शिवलिंगाचा निमुळता भाग कुठेही उत्तराभिमुख असतो. गोर बंजारा ,  लमाण गण त्याच उपयोग आधुनिक होकायंत्रासारखा करीत फिरत असे. नाही तरी त्याचे दिशाज्ञान एवढे त्रोटक आहे की बंजारा-गोर बोलीत दिशा वाचक दोनच शब्द आहेत. "  एक उचाल दुसर हेटाल " एक उगवती आणि दुसरी मावळती. म्हणूनही त्यांच्यात शिवदेवता अधिक महत्त्वपूर्ण मानल्या गेली. पारंपारिक गीतातून जसे नातरो, वाजणा, बदाई वगैरे मधून सामी,  गोसाई असे शब्द येतात ते बंजारा बोलीतील प्राचीन शिव संबोधने होत. परंतु गोर गणात शिवाची अशी विशिष्ट प्रकारच्या पुजेचे प्रावधान नाही.

            अलीकडे आसराई, वाघाई, पोचमाई, मेसाई, कोतामाय, खंडोबा, विरोबा, वाघोबा आणि मसोबा वगैरे प्राचीन नागर देखील बंजारा तांड्यातून पूजिल्या जाऊ लागलेल्या आहेत. गोरबंजारा गणाच्या आतापर्यंत विचारात घेतलेल्या देवता या उपदेवता होत. कारण  पुढे पुढे नागरी समुदायासोबतच्या  संपर्कामुळे बंजारा गणाच्या या देवतेच्या उत्क्रांतीचा मार्ग सुलभ झाला असेल. या काळानंतरचा या देवतेच्या स्वरूप व आकाराविषयीच्या काही कल्पना गोर बंजारा गणात स्पष्ट होऊ शकलेल्या आढळून येतात व या महामायारूप अनंत शक्‍तीला सगुणत्व प्राप्त झाले. त्यापूर्वी गोरबंजारा गणाच्या दृष्टीने ही देवता केवळ निर्गुण निराकार असावी व शक्‍तीच्या प्रत्यय तिची कृपा व अवकृपा यांच्या साक्षात्कारातूनच घडते असे मानल्या जात असावे. बंजारेत्तर भारतीय लोकात जसे देवीपूजेचे महत्त्व वाढत गेले तसे गोर बंजारा गणाच्या मातृदेवता-देवतास्वरूप उत्क्रांत होत गेल्यात असे मानल्यास चुकीचे ठरू नये.

( आपली प्रतिक्रिया comment मध्ये नक्की नोंदवा)

  संदर्भ:- बंजारा लोकांचा इतिहास.. बळीराम पाटील

          गोर बंजारा इतिहास.. आत्माराम कनिराम राठोड 

किशोर आत्माराम नायक 

 गोर बंजारा संस्कृती 

टिप्पण्या

  1. "गोर बंजारा संस्कृती " हे पुस्तक लिहिलेले आहे काय? यात वरील वर्णन आले आहे काय? या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? प्रकाशक कोण? आणि ते कुठे उपलब्ध होऊ शकते? कळवा..8600055038 नवलकिशोर राठोड ऊर्फ नामा नायक यवतमाळ.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोर बंजारा समाज गोत्र.. गोत (पाडा)..‌‌२ Gor Banjara Gotra, Got (pada)

बंजारानामा..... नजीर अकबराबादी #Banjaranama #Nazir_Akbarabadi

गोर बंजारा समाज गोत्र .... गोत पाडा.. १ Gor Banjara Gotra, Got (pada)

गोर बंजारा समाज पुजाविधान.४.. गोटपुजा #Gor #Banjara's #worship method ' #GOTPUJA '

गोर बंजारा समाजव्यवस्था " तांडा" Gor Banjara Social system ' TANDA'

गोर बंजारा समाज आणि देवीदेवता ...२ Gor Banjara God & Goddess