गोर बंजारा साहित्य " ताण्डा".. आत्माराम कनिराम Gor Banjara Book 'TANDA'.. Atmaram Kaniram

 गोर बंजारा साहित्य

ताण्डा.... आत्मचरित्र

लेखक :- आत्माराम कनिराम राठोड

ताण्डा.... वाचावा तर का?? (वाचक मत)

                   आत्माराम कनिराम तांड्याच्या अंगाखांद्यावर वाढून दलित चळवळीच्या मार्गाने येशूच्या कुशीत विसावलेल झुंजार वादळ यांचं आत्मचरित्र म्हणूनच नव्हे तर सिंधू संस्कृतीच्या गत वैभवशाली परंपरेपासून स्वातंत्र्योत्तर तांड्याच्या नशिबी आलेल्या वैधव्याची जाणिव करुन घेण्यासाठी....................

           घर, परिवार, मित्र, तांडा, समाज , संस्कृती, प्रथा-परंपरा, नेते, शासन, त्याची धोरणे या साऱ्या पसाऱ्याचा विरोध करत स्वतः विरुद्ध ही विद्रोह करुन उठणारा हा अवलिया .... .........आत्माराम कनिराम 

            लेखक आत्माराम कनिराम यांनी लहानपणापासून ताण्डा अनुभवला, शिकला आणि जगलाही.. त्याची व्यथा पानापानांत वाचायला मिळते. तांड्यात बापाची व्याख्या करताना म्हणतो..

      अडाणी असो वा उच्च विद्याविभूषित असो तांड्यातल्या कौटुंबिक मर्यादेत बापाचा शब्द बापाचाच असतो. बालपणात देवादिकांची लागलेली ओढ त्यात " माई" चा मोठा हातभार. त्यातूनच साकारलेल प्रसिद्ध ओवीबद्ध ग्रंथ " श्री सेवादास लिला चरित्र" . तांड्यात, घराघरात, लहानथोरापर्यत पोहचलं. 

Gor Banjara Sanskruti


       तांडा .. त्याच वैभव, त्याची परंपरा, रितीरिवाज याविषयी " गोर बंजारा इतिहास " या पुस्तकात भरभरून लिहीणारा लेखक स्वातंत्र्योत्तर काळात तांड्यांच्या नशिबी आलेला परकेपणाची खंत व्यक्त करताना म्हणतो..

      इतिहास काळात दोन सैन्य लढत असताना त्यांच्या मधोमध निश्चित मनाने वावरणारा तांडा असा ज्याचा उल्लेख परकीय इतिहासकार करतात तोच तांडा 1857-1947च च्या काळात या देशातून एकदमच कसा काय लुप्त झाला हो? त्याने स्वातंत्र्यासाठी खरंच एकही जीव दिला नाही की? तुम्ही सोयीस्करपणे सगळे विसरलात , आपलीच लाल करवून घेण्याच्या नादात?

       स्वातंत्र्य मिळालं खरं पण तांड्यात कुठं पोहचलं? सर्वांनी आपापल्या तुंबड्या भरण्याच्या नादात तांडा यांच्या स्मरणातूनच गेला! स्वातंत्र्य, समता, बंधुता तळागाळापर्यंत पोचविण्याचे काम करणाऱ्या चळवळी, संघटनांच्या बाबतीत लेखक म्हणतो..

   सत्तेपासून दूर फेकल्या गेलेल्या वैफल्यात जनसंघीय शाखा फक्त दक्ष होत राहील्या. रिपब्लिकन पक्षाने निळ्या टोप्या फक्त दिक्षाभूमीवर प्रदर्शित करण्यापुरत्याच राखून ठेवल्या. एरवी गारिप-खोरीप या न संपु शकणाऱ्या वांधेवाडीत गहाण ठेवलेल्या. कम्युनिस्ट ची दांडी तर भूदानने केव्हांच उडवली!! अशा अवस्थेत माझ्या तांड्यापर्यंत हे सगळे कोण पोहचवणार?

        आणि स्वातंत्र्य समाजात , तांड्यात घेऊन आला पुजारी आणि पुढारी अशा दोन जाती ज्यांनी अज्ञान, अंधश्रद्धेचा फायदाच घेतला.

           पुजाऱ्यासारखाच पुढाऱ्यांनी ही वर्गणी मिळवायचा उद्योग सुरू केला. पुजाऱ्यांनी दैवी कृपेचे तर पुढाऱ्यांनी राजलोभाचे प्रलोभन माझ्या अडाणी समाजासमोर ठेवले. या सगळ्या गोष्टींची किती चिड येते हे तुम्हाला आत्माराम कनिराम झाल्याशिवाय कळणार नाही....?

    तांड्याचा भाबडेपणा सांगावा तरी किती? हा प्रश्न उपस्थित करताना लेखक सांगतात...........जर मी तांड्यात राहीलो असतो.. तर मुद्दाम होऊन पोचवलेल्या नेहरू गांधीशिवाय दुसरा थोर पुरुष अवार्चीन इतिहासात झाल्याचे माहीतही झाले नसते.. डॉ.आंबेडकर हे नाव आणिबाणीत तर राजर्षी शाहू.. फुले ही नावे कळायला कितीतरी वर्षे लागली..

      समाजाला लागलेली जाती व्यवस्थेची किड तांड्यातही पसरली... नाहीतर लेखकाच्या " बा " ने उगाच म्हटलं नसतं. मराठवाडा विद्यापीठ नामांतर प्रकरणात अटक झाल्यानंतर... " थू त्याच्या..... भोसडीचा कुठला धेडबियाचा आला माझ्या कुळाला?.." लोक नाईक साहेबांच्या पाठी जिव देतात आणि हा कुत्र्याच्या आंडासारखा बाहेर पडुन राहतो.

    तांडा , पाड्यावर शिक्षणाची होत असलेली हेळसांड पाहून लेखक सांगतात.. दुर्गम भागातील ज्या आदिवासी च्या पोरांना गणपतीच माहीत नाही. त्यांना ग-गणपतीचा कसा कळेल? तो ग कसा शिकेल? त्याला ग-गटारीचा शिकवा, ग-गाढवाचा शिकवा.

      शिक्षणाच्या वाढत्या प्रवाहाच्या लाटेची भिती पण लेखक मनात धोक्याची घंटा वाजवून जाते . 

........... ...काय सांगू भिती वाटते? पुजारी व पुढाऱ्यानंतर पदवीधर, नोकरीवाल्यांची तसलीच एक नवी जात तांड्यात जन्माला न येवो....

            घरची परिस्थिती बिकट असताना शिक्षणासाठी चाललेला संघर्ष .. घर-- समाजातून होणारी हेळसांड, करावी लागणरी छोटी मोठी कामे, त्यातून आलेले अनुभव, बिघडत चाललेला समाज, नितीमता यातूनच विद्रोही विचारांची धार आत्माराम कनिराम च्या लेखनीला आली.

   स्वातंत्र्य, समाजवाद , समानता या स्वप्नवतच राहीलेल्या बाबी दृष्टीस आणताना गरीबी, अज्ञान , अंधश्रद्धा, निरक्षरता यासारख्या आ वासून उभ्या असलेल्या समस्यांचा पाढा लेखक वाचतो.

येईल तेव्हा येईल    

तो समाजवाद

अनेकांनी अनेकवेळा

आश्वाशीलेला.

अजून तर, 

आमच्या पर्यंत यायची आहे.

बैलांनाही मिळणारी विश्रांती

वर्षातून एक दिवसाची, पोळ्याची .

नाम्यारे! तू विचारलेस ना कुठेतरी

" स्वातंत्र्य" कोणत्या गाढवीच नाव आहे?

 ते याच . बरं का बाप्पा!

 जिथं कलम कसायाला आलिशान अन्न, वस्त्र, निवारा मिळत असते

 आणि स्वतःच्या रक्ताच्या फाळाने जमिन नांगरणाऱ्या 

धरतीच्या धनीला भाकरीला महाग व्हावे लागते?

ज्योतिबा! आज हवेत आम्हाला. तुम्ही असते तर ' शेतकऱ्यांची गुलामगिरी' नंतर नक्कीच आणि नक्कीच ' स्वातंत्र्याची गुलामगिरी' लिहीली असती.

   एकदा का एखादा मार्क्स, एखादा फिडेल कॅस्ट्रो एखदाचे एकदम तांड्याच्या शिवेवर आले की, त्यांच्यापैकी कोणालाही तांड्यातून विन्मुख जावे लागणार नाही. क्रांतीची तृप्त ढेकर दिल्याशिवाय.. 

       " रती " पानापानांत डोकवणारी लेखकाची प्रेयसी पुस्तक वाचताना अलगदच डोकावून पसार होते.. तिचा विरह लेखक खुप ठिकाणी मांडतांना दिसतो. त्यावेळी आतील कवीमन जागृत होतो. स्वतःच्या जिवनातील आमुलाग्र परिवर्तनाची खंत लेखक सांगतो....... आज ती जवळ नाही याची जाणीव झाली की लेखनी थांबते. तिनं वाचलाच तांडा तर तिला कळेल........

   पुस्तकाच्या प्रत्येक पानावर लेखक वेगवेगळ्या छटात भेटतो. कधी बालपणात रमलेला, कधी परिस्थिती ने ग्रासलेला, व्यवस्थेत भरकटलेला, मनातून खचलेला, पुन्हा उभारी घेतलेला, गोर बंजारा संस्कृतीची नाळ जुळलेला, दलित चळवळीत मुरलेला, आणि शेवटी येशुच्या दरबारात " डॅनियल राणा" बनलेला !!!!!!

     असा हा आत्माराम कनिराम चा ताण्डा... राजदूत प्रकाशन, यवतमाळ द्वारा प्रकाशित...एकदा वाचावा असा . अनेक भाषेत अनुवादित झालेला.. साहित्यातील एक अमीट ठसा उमटविलेला... परंतु मनाला वाटतं..

        खरंतर "ताण्डा " तांड्यातच उपेक्षित राहिला.. ईतरांविषयी काय सांगू?.........

       ताण्डा...✍️ आत्माराम कनिराम राठोड

    पुस्तक परिचय... किशोर आत्माराम नायक
          गोर बंजारा संस्कृती

.......................,..........................

पुस्तकांसाठी......

धोळी बुक सेंटर..परतवाडी तांडा जालना.. 9765708482

दमाळ बुक सेंटर..... जिवती..चंद्रपूर..9890221577

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोर बंजारा समाज आणि देवीदेवता.. १ Gor Banjara God & Goddess

गोर बंजारा समाज गोत्र.. गोत (पाडा)..‌‌२ Gor Banjara Gotra, Got (pada)

बंजारानामा..... नजीर अकबराबादी #Banjaranama #Nazir_Akbarabadi

गोर बंजारा समाज गोत्र .... गोत पाडा.. १ Gor Banjara Gotra, Got (pada)

गोर बंजारा समाज पुजाविधान.४.. गोटपुजा #Gor #Banjara's #worship method ' #GOTPUJA '

गोर बंजारा समाजव्यवस्था " तांडा" Gor Banjara Social system ' TANDA'

गोर बंजारा समाज आणि देवीदेवता ...२ Gor Banjara God & Goddess