गोर बंजारा समाज उत्पत्ती आणि इतिहास :- १ Gor Banjara Origin & History
गोर बंजारा उत्पत्ती व मुळ
विविध वैज्ञानिकांनी मानवी प्रजातीच्या उत्पत्ती विषयी वेगवेगळ्या प्रकारचे मत नोंदविले आहे. इतर प्राण्यांपेक्षा मानवी प्रजातीच्या विकासाला अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने मानव उत्क्रांत होत गेला. कळप करून राहणे व जंगलातील विविध वनस्पती, फळ, फुले यावर आपली उपजीविका भागविणे हा नित्यक्रम. कालानुक्रमे आगीचा शोध, विविध हत्यारे यांच्या माध्यमातून उपजीविकेचे नवीन साधन शोधण्याचा प्रयत्न सतत करत गेला. पशु पक्षी पालन करणे, व त्यांच्या दुध, मांस यावर आपल्या समुहाची भुक भागविण्याची नवीन पद्धती उपलब्ध झाली. ऋतूमानानुसार आपली जनावरे घेऊन विविध भागांमध्ये भटकंती करत जीवन जगणे हाच एकमेव उद्देश होता.
विविध साहित्यामध्ये गोर बंजारा
राहूल सांकृत्ययान यांच्या " वोल्गा से गंगा" यामध्ये जनावरे घेऊन भटकंती करणाऱ्या मानवी समुहाचे वर्णन आलेले आहे. वेदांमध्ये जनावरे बाळगणारे तसेच विविध मालाची वाहतूक करणाऱ्या "पणी" या समुहाबाबत अनेक ऋचा समाविष्ट आहेत. या समुहापासून संरक्षण करणे व त्यांना नष्ट करण्यासाठी देवाचे आवाहन या ऋचा मधून केलेले आढळते. बौद्ध जातक कथामध्ये " सार्थवाह" नावाने ओळखल्या जाणाऱ्या समुहाचे वर्णन आढळून येते. बौद्ध भिक्खू ना धम्म प्रचारासाठी याच समुहाची भरपुर साथसोबत मिळाली होती हे लक्षात येते.
सिंधू संस्कृतीच्या शोधात अनेक ठिकाणी उत्खनन झालेले आहे. उत्खननात सापडलेल्या अनेक साहित्य, वास्तू या प्राणी पाळणाऱ्या समुहासी निगडीत आहे. हे अनेक विद्वानांनी स्पष्ट केले आहे.
जगाच्या इतिहासात हजारो वर्षांपासून गाय , बैल, शेळ्या, मेंढ्या इत्यादी जनावरे बाळगणारे व त्यांच्या पाठीवर मालाची ने-आण करणाऱ्या समुहाचे अस्तित्व निदर्शनास येते. मानवी समुह एका ठिकाणी स्थायी वस्ती करून राहायला लागले. तरी काही विशिष्ट मानवी समुह यांनी भटकंतीचे जीवन चालूच ठेवले. हजारो वर्षांपासून हि भटकंती अविरत चालू होती. जगाच्या एका भागाला दुसऱ्या भागाशी जोडण्याचे, दळणवळणाचे कार्य या विशिष्ट समुहाकडून झाले.
अशाच एका मानवी समुहाचे अस्तित्व आजही अस्तित्वात आहे. विविध देशात, प्रांतात त्या समुहाला वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाते. कुठे बंजारा, बणजारा, लमाण, लभाणा, सुगाडी, वनजारा, रोमा बंजारा अशी विविध नावे त्याला बहाल करण्यात आलेली आहे. केवळ मालाची ने-आण करणार्या बंजारा लोकगणाचा उल्लेख पूर्वीच्या ग्रंथात न येण्याचे कारण या गणात एक स्वतंत्र समाज म्हणून स्थान मिळवायला लागलेला काळ, हे जसे संभवते तसेच या लोकगणाचे ‘बंजारा’ असे नामकरण निश्चित करायलाच बंजारेत्तरांना एवढा काळ लागला असेल हे ही शक्य आहे. कारण ‘बंजारा’ हा शब्द संस्कृत किंवा संस्कृतच्या कोणत्याही सहभाषेचा नसून अरबी-फारशी भाषेतून तो आलेला आहे. अर्थात या लोकगणाला ‘बंजारा’ हे विशेषनाम मुस्लिमांनी दिलेले आहे. म्हणूनच या लोकांचा उल्लेख हिंदुस्थानात मुसलमानांनी स्वतंत्र ग्रंथरचना करावयास प्रारंभ केल्यानंतरचा आहे. मुसलमानांनी यांचे नामकरणच केले नाही तर कधी छळून, चोपून आणि कधी कधी सनदा देत देत चुचकारून यांच्याशी जपळीक साधली व आपल्या युद्ध ठाण्यांना-रणांगणावर रसद पोचविण्याची कामगिरी यांच्यावर सोपविली व त्यांच्या धंद्यास वैभवाचा काळ आणून दिला.
परंतु हा समाज स्वतःला आजही गोरबंजारा समजतो . ओळख देताना " म गोरमाटी" अशीच देतो...
क्रमशः......
किशोर आत्माराम नायक
गोर बंजारा संस्कृती
छान
उत्तर द्याहटवा