गोर बंजारा समाज पुजाविधान.. ५. धबुकार #Gor #Banjara's #worship method '#DHABUKAR'
गोर बंजारा समाज पुजाविधान ...५
धबुकार
गोर बंजारा गणात देवीदेवता व पुर्वजांच्या पुजा पद्धती अग्नीत हवी देवून करतात. यात "भोग " व " धबुकार" असे दोन प्रकार पडतात. " भोग" मातृदेवता व सतगुरू सेवालाल, लिंगायत सामी, श्री बालाजी यादेवतांना अग्निमध्ये ( निखाऱ्यावर) द्यावयाच्या हवीला म्हणतात. पुर्वजांच्या नावाने व होळी, दिवाळीच्या नावाने दिल्या जाणाऱ्या अग्नीतील ( निखाऱ्यावर) हवीला " धबुकार" असे म्हणतात. धबूकार साठी जे प्राचीन नैवेद्य सांगितलेले आहे त्यात कडाई, लापसी व वळकट (शेवया) असे पदार्थ विशेष येतात. रव्यासारखे जाड कणिक उकळत्या गोड पाण्यात घोटीत शिजवले की ‘कडाई’ हा पदार्थ तयार होतो. लापसी व शेवया (वळवट) हे पदार्थ विशेष सार्वत्रिकच आहेत.
धबुकार पुजा पद्धती प्रकार पहिला
नैवेद्याचे पदार्थ तयार झाले की पूजेचे ताट तयार करतात. ताटात बनविलेला पदार्थ टाकले की पूजेचे ताट तयार झाले. हल्ली अगरबत्ती पेटवून घेतात. तांब्याभरून (लोटा) पाणी घेतात. पूजेचे ताट चुलीसमोर ठेवतात. पाण्याचे भांडे पूजा करणार्यांच्या डाव्या बाजूला ठेवायचे असते. चुलीवर असलेले भांडे उतरवून ठेवतात. पूजा करणारा डोक्याला फटका वा शेला गुंडाळतो. उघड्या डोक्याने पूजा केली जात नाही. पूजेसाठी घेतलेल्या पदार्थांचे पाच घास तुपासह चुलीतील विस्तवावर टाकतो. असतील तेवढे पदार्थ एका जागी कालवण्याची पद्धत नाही. सर्व पदार्थ स्वतंत्रपणे टाकावेत. असा संकेत आहे. नैवेद्यार्पण केल्यावर भांड्यातील पाणी उजव्या हातात घेऊन प्रथम शिंपडतात. धार दिल्यासारखे हे शिंपडणे असते. नंतर चुलीवर व शेवटी धबुकारसाठी जमलेल्यांच्या बाजूने पाणी (एक वेळ) शिंपडतात. नंतर "धबुकार " देणारा चुलीला नमस्कार करतो. त्याबरोबर सर्व उपस्थित लोक शक्यतो जोडलेल्या हातासह डोके जमिनीला टेकेपर्यंत वाकून नमस्कार करतात.
धबुकार पुजा पद्धती प्रकार दुसरा
याशिवाय धबुकार दुसर्या एका पद्धतीने देण्याची प्रथा आहे. चुलीऐवजी घरात असलेल्या नित्य किंवा नैमित्यिक पूजास्थानावर चुलीमधील निखारे नेऊन ठेवून त्यावर वरील पद्धतीने नैवेद्य टाकून ‘धबुकार’ नैवेद्य देता येते. नमस्कार करण्यापूर्वी पुरुष उभे राहून चुलीसमोर मनोमन व क्वचित प्रसंगीच्या दुसर्या पद्धतीप्रमाणे ‘धबुकार’ दिला जातो. यावेळी मनोमन किंवा प्रगट प्रार्थना करतात. देवीदेवतांची पुजा असेल तर " विन्ती" म्हणतात. ( आरदासाचे एक रुप.. ज्यात संबंधित देवतांचे वा पुर्वजांचे नाव घेऊन विन्ती बोलतात.) व नंतर नमस्कार करतात. स्त्रियांनी यावेळी हात जोडून बसलेले असावे लागते. पुरुष नमस्कार करू लागल्यावर ओढणीचा पदर हाती ठेवून त्या नमस्कार करतात हेही वैशिष्ट्यपूर्णच! सती देवी, सामकी माता, पूर्वज व सण (दिवाळी व होळी यांच्या नावानेही) वगैरे साठी हे विधान असते. दिवसा कोणत्याही वेळेस सूर्योदयानंतर सूर्यास्तापर्यंत व अशक्यच झाल्यास रात्रीपण ‘धबुकार’ देता येतो.
हिंदू धर्मात पितृमोक्ष अमावस्येला पितरांना श्राद्ध करतात. तर गोर बंजारा गणात दिवाळी व होळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पुर्वजांच्या नावाने " धबुकार" दिल्या जातो. याला " नेवसपाणी" असे म्हणतात. गोर गणात मुलगा आईवडिलांच्या नावाने जर मयत झालेले असतील तर " धबुकार " देत असतो. यावेळी पुर्वजाला आवडणारे पदार्थ सुद्धा अर्पण करतात. यात सुपारी, तंबाखू, विडी, चिलीम, दारु यासारख्या गोष्टींचा समावेश असतो. पुर्वजाना दिवाळी, होळी व्यतिरिक्त जर कुटूबांत " गोटपुजा" करत असतील तरच " धबुकार" दिल्या जातो इतर वेळी नाही. " धबुकार" साठी " कडाई, लापसी, खिर, शेवया " यासारखे परंपरागत, प्राचीन पदार्थ बनवितात. या पदार्थांचा विचार करता गोर गणात अस्तित्वात असलेली हि पद्धत अतिप्राचीन काळापासून चालत आलेली आहे हे निदर्शनास येते. इतर कोणत्याही धर्मात न आढळणारी " भोग व धबुकार" पद्धती गोर बंजारा समाज आदिम काळापासून अस्तित्वात असल्याचा दावा करते. या पुजाविधानाचा सखोल आणि चिकित्सक अभ्यास झाला तर निश्चितच गोर बंजारा संस्कृतीच्या प्राचीन इतिहासाच्या अभ्यासाला नवी दिशा मिळेल.
आपली प्रतिक्रिया ( comment) अवश्य नोंदवा
किशोर आत्माराम नायक
गोर बंजारा संस्कृती
महत्वपूर्ण माहिती
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवा