गोर बंजारा समाज पुजाविधान..२.. दसराव ( देवीर घट ) Gor Banjara's worship method ' DASRAO '

गोर बंजारा समाज पुजाविधान 

 दसराव (देवीर घट)

                 केवळ देवी पूजक गोत्रात देवीच्याच नावाने " दसराव "  केल्या जातो. प्राचीन काळी देवीच्या प्रतिमेएवजी चांदीचे नाणे असे. कालानुरूप त्यात बदल झाला. आताच्या काळात चांदी वा सोन्याची प्रतिमा वापरतात. या गोत्रामध्ये असणारी देवीची रौप्य वा सुवर्णाची प्रतिमा दसराव नियोजित दिवशी उजळून (वजळान) आणायची असते. चैत्र व अश्विन मासातील ( पेल ते दसवी माळ) प्रथमा ते दशमी पर्यंत कोणत्याही दिवसी. तसेच इतर वेळी मंगळवारी हि पुजा ठेवली जाते. देव उजळायला गेलेली व्यक्‍ती परत आली की, तांड्याबाहेर थांबून तेथून निरोप पाठवतो. निरोप मिळाला की, त्याचे कुटुंबीय, तांड्यांतील स्त्री पुरुष व गोरबोलीतील भजन करणार्‍यांना थाळी, नंगारा यावाद्यांसह बोलावून आपल्या सोबत घेतात.  सुपारी, नागवेलीचे पान, हळद कुंकू वगैरे पूजा साहित्य असलेले ताट व गडवाभर पाणी घेऊन हे लोक देवी आणणार्‍यास सामोरे जातात. त्यावेळी स्त्रिया गातात ते गाणे प्राचीन आणि वेगळ्या लयीत आहे.. 



                 देवी लयेन जायेर गीद 

     बारन कोसेप मैया बाळदा बगदी। 

     हूँ ये मैया बाळदा बगदीये॥ 

     आन दये मैया सेवा करे 

     धन दये मैया सेवा करे 

     पुत दये मैया सेवा करे 

     असे गीत गात देवी घेऊन येणार्‍या पर्यंत पोचल्यावर त्याचे पाय धुतात. मग देवी असेल त्या पिशवीला हळद; कुंकू, पान; सुपारी वाहून नमस्कार करून देवी घरी नेऊ लागतात. वाजत गाजत देव घरी आणतात. देव घरी आणल्यावर तांड्यातील " डायसाणी" स्त्रीया देवीचे  गाणे  गातात , ज्याला  'ओळंग’ म्हणतात.   

     ओळंग

      धोळे देवळती आरत आई मां-२ 

       धजा नारळ तोन भेट चडाइये रात मा॥१  

       माता तारी आरत सदा सदा  

       भवानी तारी आरत सदा सदा॥धृ॥ 

        काचकेरो दिवालो, कपूरकेरी वातमा  

       जगमग जोत लागाइ सारी रात ये॥२  

       माता तारी आरत सदा सदा !!!!!!!!!

       .  घरी आणून ती प्रतिमा गोमूत्र, दूध, दही, तूप व पाणी यांनी वेगवेगळी धुतात व मग ‘चोको’ काढून त्यात ठेवतात. हळद कुंकू वाहतात. तद्नंतर पुजेसाठी असलेला बोकड आणल्या जातो. बोकडाची जोडी असावी लागते. सारी मंडळी देवासमोर हात जोडून उभे राहतात. पुरुष डोक्यावर पगडी, फटका, शेला बांधतात तर स्त्रिया डोक्यावर ओढणी, पामडीचा पदर घेतात. कोणीही उघड्या डोक्याने राहू नये असा नियम पाळतात. बोकुड ने " धडधडी" घेलती की बकरे कापले जातात. बोकडाचे मुंडके, पाय व छातीचा पुठ्ठा (करोयी) व मागील शाबूत भाग देवासमोर ठेवतात. कडाव व नारेजाचा प्रसाद देवीला ठेवल्या जातो. देवीला भोग लावल्या जातो. भगत वा जाणता देवीची आरदास म्हणतो...

       आरदास 

       जे - जे मर्‍यामा याडी 

       धोळे खडयार आस्वारी येणो। 

       पडी तेग खडी करणो। 

       समरवत आढळ आणो। 

       खेप वटाव रूपारेल चलाणो। 

       दी पगार साई व्हेणो। 

       चार पगार साई व्हेणो। 

       राक वटाव वत पाक करणो। याडी मावली॥...

       काळे मातरे मनक्या छा।परेपगेम चुकाचा 

       चुकी भुली कर्बाण करणो। इतार नामेर पुजा किदे जेन 

       आपेर दरबारेम पूचतो करलेणो। याडी मावली॥... 

        सर्व लहानथोर जमिनीपर्यंत वाकून पाया पडतात. छड पूजा एक बोकूड असला तरी होऊ शकते व चोकोमध्ये ठेवलेले साहित्य (बोकडाचे अवयव) पूजा झाल्यावर लगेच उचलता येते. तेथे पूजेसाठी लावलेला दिवा काढता येतो. दसराव मध्ये बळीच्या बोकडांची संख्या दोन‌ किंवा दोन पेक्षा जास्त असावीच लागते. चोको मध्ये ठेवलेले बळीचे अवयव रात्रभर तसेच असू द्यावे लागतात. गोडतेल किंवा तुपाचा दिवा रात्रभर तेवत ठेवावा लागतो. गोरबंजारा गण यालाच ‘देवीचा घट’ म्हणतो. या घटाठायी बसून रात्रभर थाळी नगार्‍यावरील भजन चालू असते. भजन करणारे लोक उगवतीला ‘आरत’ नावाचे पारंपारिक आरती म्हणतात.

         आरत - 

       चोको पुरदी जग मोतीयार। गोले तारा॥धृ॥ 

       साती भेनेरी आरत उतरीरे। गोले तारा॥१॥

        देवी म देवी कुणसी मोटी व्हीयर?। गोले तारा॥

        देवी म देवी मर्‍यामा मोटी व्हीयर । गोले तारा॥२॥

          ही ‘आरत’ झाल्यावर चोको जवळील पहिल्या दिवसाचा असलेला (नारेजा)प्रसाद व बोकडाचे अवयव उचलले जाते.  नंतर दिवा व देवीची प्रतिमा उचलता येते. सर्व उपस्थित लोकांना नारेजा वाटप केल्या जातो. कुटूबांत नववधू असेल वा परिवारातील एखाद्या  स्त्रीस पुत्र होत नसेल तर देवीजवळचा प्रसाद ( घुंडीवाळो हाडका ) खायला देतात. त्यामुळे परिवार वृद्धी होते असा प्राचीन संकेत आहे. काही ठिकाणी लहान मुलांचे टाळूचे केस ( जावळ ) पण याच वेळी काढल्या जाते. जाळव काढताना एका परिवारातील कमीतकमी दोन  बाळ ( मुलं) असावीत अशी प्रथा आहे. काही मुलांच्या डोक्यावर असणारी " जावळ" केसाची शेंडी दहा- बारा वर्षांपर्यंत राहीलेली उदाहरणे तांड्यात सापडतात. आताच्या काळात जोडी नसेल तर याला पर्याय म्हणून नारळ ठेवतात. जावळ काढण्याचा मान " मामा " असतो.

           दसराव ' घटपुजा ' यावेळी काढलेली कुलदेवतेला पुन्हा " कोतळीत" ठेवतात. पुढील वेळी जेव्हा यजमानांना पुजा करणे शक्य होईल तेव्हांच देवी बाहेर काढल्या जाते. संयुक्त कुटुंबात असलेली " देवीर कोतळी " कुटूंब विभक्त होताना लहान भावाकडे दिली जाते. येथे दसरावचे पूजाविधानही संपते.

किशोर आत्माराम नायक

गोर बंजारा संस्कृती 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोर बंजारा समाज आणि देवीदेवता.. १ Gor Banjara God & Goddess

गोर बंजारा समाज गोत्र.. गोत (पाडा)..‌‌२ Gor Banjara Gotra, Got (pada)

बंजारानामा..... नजीर अकबराबादी #Banjaranama #Nazir_Akbarabadi

गोर बंजारा समाज गोत्र .... गोत पाडा.. १ Gor Banjara Gotra, Got (pada)

गोर बंजारा समाज पुजाविधान.४.. गोटपुजा #Gor #Banjara's #worship method ' #GOTPUJA '

गोर बंजारा समाजव्यवस्था " तांडा" Gor Banjara Social system ' TANDA'

गोर बंजारा समाज आणि देवीदेवता ...२ Gor Banjara God & Goddess