गोर बंजारा समाज पुजाविधान.४.. गोटपुजा #Gor #Banjara's #worship method ' #GOTPUJA '

 गोर बंजारा समाज पुजाविधान..४

  गोटपुजा

        ‘गोट’ म्हणजे मृत पूर्वजांची सबली पूजा. याची पद्धती देखिल ‘पूजा’ पद्धतीची असून यातही ‘चोको पुरण्यात’ काढण्यात येतो. फक्‍त ‘विन्ती’ पूर्वजांच्या नावाने म्हणावयाची असते. ‘गोट’ फक्‍त पूजकांचे आई-वडील किंवा त्याच्या वडील किंवा वडिलांचे आईवडील (आजोबा आजी) पैतृक एवढ्याच लोकांची करतात. सामान्यतः गोर गणात पुर्वजाना दिवाळी व होळी या सणाच्या दूसऱ्या दिवसी त्यांच्या नावाने  " धबुकार" देत असतात. याकरिता शेव, खिर, लापसी यासारख्या आदिम काळापासून प्रचलित असलेले पदार्थ बनवितात. परिवारात काही शुभ प्रसंग असेल वा परिवारावरील एखादे अरिष्ट टळले असेल अशा वेळी साधारणपणे " गोटपुजा" करतात. येथे हे ही लक्षात घेणे आवश्यक आहे की पारधी, बेलदार, घिसडी, मसणजोगी अशा अनेक आदिम जमातीत ‘गोट’ प्रचलित आहे. गोट करणार्‍यासर्वच जाती-जमातीशी गोर बंजारा गणाचा पूर्वानुबंध आहे यावर सखोल, निष्पक्ष आणि चिकित्सक अभ्यास व्हावा . ज्यामुळे या जमाती आणि त्यांचे पृथ्वीतलावरील प्राचीन पाऊलखुणाचा काळ माहीत होईल.



गोटपुजा पद्धती 

        गोर बंजारा गण गोटपुजेसाठी ठराविक असा दिवस नेमलेला नाही. परंतु रविवार, मंगळवार, शुक्रवार यापैकी एक दिवस निवडतात.  पुर्वजपुजेसाठी पण " चोको " काढल्या जातो. पण तो अंगणात,  अंगणाच्या उजव्या बाजूला शेणाने जागा सारवून " चोको" काढतात. त्यावर कलदार रुपया ठेवून पाण्याने भरलेला गडवा ( लोटा) ठेवतात.  दाभन, लिंबाच्या झाडांची डहाळी पुजेच्या ठिकाणी ठेवण्यात येते. बळी देण्यासाठीचा बोकुड आणल्या जाते. उपस्थित सर्व लोक गोलाकार हात जोडून उभे राहतात. .

          ... ल बापु ल.. ल याडी ल..  चुकभुल पदरेम ल..

          अशी प्रार्थना करतात. बोकडाने " धडधडी " घेतली की, मुंडके व पाय चोको समोर ठेवतात.  "दसराव" पुजे प्रमाणे पायाकडील भाग पुजेठिकाणी ठेवत नाहीत. बोकडाच्या रक्त व मांसापासून " सळोयी" नावाचा पदार्थ बनवितात.‌ प्रसाद तयार झाल्यानंतर घरातील कर्ता पुरुष " धबुकार" देतो. जळत्या निखाऱ्यावर बनविलेला पदार्थ व तुपाची धार टाकून " धबूकार " देतो. यावेळी पुर्वजाला जर कोणत्याही पदार्थाची आवड असेल तो पदार्थ अर्पण केल्या जातो. तंबाखू, विडी ठेवल्या जाते जर दारू असेल तर त्याची धार जमीनीवर सोडतात. याला " धार देयरो" असे म्हणतात.

          कल्पिलेले इस्पित साध्य व्हावे म्हणून, इस्पित साध्य झाले तर, किंवा "  भगत, जाणिया" ने आजार वा संकटातून बाहेर पडण्यासाठी " बादा" दिला असेल तर व ते संकट टळले तर यासारख्या व इतरही कारणासाठी गोर बंजारा गण " गोटपुजा " करतात.

         याशिवाय गोर-बंजारा- गणातील ऐतिहासिक पुरुष मिठू, भूकिया, सोमा भंगी, केसा जंगी आदिची ‘सबली पूजा’ होते. भगवान सेवादास या आराध्य संतपुरुषाच्या नावाने बळी देत नाहीत. गोर बंजारा गणाची पूजा विधान पद्धती अशी आहे. ती मूळ स्वरूपात देण्याचा कसोशीचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. या पूजा पद्धतीचे संशोधन होऊन त्यावर अधिकारी लोकांनी आपले संशोधनात्मक विचार व्यक्त करावे हि अपेक्षा. तसे झाले तर समाजशास्त्रीयदृष्ट्या गोर गणाच्या उत्पत्ती, विकास शोधण्यासाठी मोलाची मदत होईल. 

         गोर बंजारा गणाच्या पूजा विषयक सर्व विधानात स्त्रियांना कोणत्याही प्रकार सक्रीय सहभागी होण्याचे कारण ठेवलेले नाही. ‘धबुकार’, ‘भोग’ किंवा ‘पूजा’ यापैकी कोणत्याही पूजाविशेषांचे नैवेद्य स्त्रियांना अर्पण करता येत नाही. याउलट जन्मापासून विवाहापर्यंतच्या कोणत्याही संस्कारात पुरुषांना महत्त्वपूर्ण सहभाग दिलेला नाही. मुद्दामहून ठेवल्या गेलेले स्त्री-पुरुष अधिकारातील अंतर महत्त्वपूर्ण आहे. त्यामागे एक दृढ विचार आहे. त्याचा डोळसपणे विचार व्हावा. निश्चितपणे या पुजाविधानाचा सखोल संशोधन झाले तर गोर बंजारा गण मुळ आदिम असलेल्या समाजपैकी एक असेल हे सप्रमाण सिद्ध होईल.

         (आपली प्रतिक्रिया comment अवश्य नोंदवा)

         किशोर आत्माराम नायक

         गोर बंजारा संस्कृती 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोर बंजारा समाज आणि देवीदेवता.. १ Gor Banjara God & Goddess

गोर बंजारा समाज गोत्र.. गोत (पाडा)..‌‌२ Gor Banjara Gotra, Got (pada)

बंजारानामा..... नजीर अकबराबादी #Banjaranama #Nazir_Akbarabadi

गोर बंजारा समाज गोत्र .... गोत पाडा.. १ Gor Banjara Gotra, Got (pada)

गोर बंजारा समाजव्यवस्था " तांडा" Gor Banjara Social system ' TANDA'

गोर बंजारा समाज आणि देवीदेवता ...२ Gor Banjara God & Goddess