गोर बंजारा समाजव्यवस्था " तांडा" Gor Banjara Social system ' TANDA'
गोर बंजारा समाजव्यवस्था
" तांडा "
गोर बंजारा गणसमाज अनंत काळापासून आपल्या रुढी, परंपरा, रितीरिवाज जपत आला आहे. हजारो वर्षांपासूनच्या परंपरा टिकून राहण्याचे महत्वाचे कारण म्हणजे गोर गणाचे " तांडा " संघटन होय. " तांडा" गाव वस्तीच्या बाहेर, सतत भटकंती करणारा. बैलाच्या पाठीवर, बैलगाडीतून मालाची ने-आण करणे हा पारंपरिक व्यवसाय. जगाच्या कानाकोपऱ्यात फिरून जगाला जगणं आणि जगण्याची पद्धत शिकविणे. मालाच्या या वाहतूकीला तांडा " लदेणी" असे म्हणतो. आणि माल उचल करण्याच्या या प्रक्रियेला " खेप वटाणो" असे गोरबोली सांगतो. " तांडा" ज्यांच्या जीवनाचा भाग त्याला " गोर " तर इतर समाजातील लोकांना " कोर" म्हणून संबोधतो. " म गोरमाटी" अशी अख्या जगासमोर ओळख देणारा गोर बंजारा गण. पण याच गोर बंजारा गणाला जगाने हजारो नाव बहाल केलीत. कुणी बंणजारा, बंजारी, कुणी लमाण, लम्बाडा, तर कुणी सुगाली , शिंगाडीया असे एक ना अनेक नावे दिलेली आहेत. परंतु गोर बंजारा गणाला त्याच काही सोयरसुतक नव्हतंच. गोर बंजारा समाजाने याविषयी विचार केलाच नाही कधी. " तांडा" आपल्या रुढी, प्रथा, परंपरा सांभाळत जगत, झगडत आला. आज हजारो वर्षांनंतरही गोर बंजारा गणाच्या प्रथा परंपरा जिवंत आहेत याच हेच एकमेव कारण आहे. आणि या परंपरा.. ज्याला गोर बंजारा गण " धाटी " असे म्हणतो अस्तित्वात राहण्याचे कारण म्हणजे तांड्यातील समाजव्यवस्था होय.
" तांडा "
" तांडा" सामान्यतः बहिर्विवाही गोत्रगटाचा एक समूह असतो. गोरबंजारा गणाचे सामाजिक संघटन त्याच्या गोत्रगटावर आधारलेले आढळते. गोर गणात मुख्यत्वे सहा गोत्र.. भुकीया, झरपला, पालतिया, वडतिया, बाणोंत, तुरी हे आहेत. हा गोतसमुह एकमेकांना भेटताना " सगासेण" असे संबोधन वापरतो. अशा सयी सगासेण मिळून तांडा बनलेला असतो. वरील निर्देशित सहा गोताने जरी तांडा बनत असला तरी तांड्यात ढालीया, नावी ( न्हावी), सनार ( सोनार) , ढाडी इत्यादी गोर गणाचाही त्यात समावेश असतो. सर्व गोत, पाड्यातील लोक गुण्यागोविंदाने नांदत असतात. त्यामागील मुख्य कारण म्हणजे तांड्यातील समाजव्यवस्था होय. जी प्रत्येक तांड्याला एकत्रित बांधून ठेवण्याचे कार्य अविरत करत आलेली आहे.
तांडा समाजव्यवस्था
गोर बंजारा गणाच्या समुहातील, तांड्यातील समाजव्यवस्था बळकट राहावी. सर्वांचे हक्क अबाधित रहावे, अन्यायग्रस्तांना न्याय मिळावा, विविध सण, उत्सव पारंपारिक पद्धतीने पार पडावेत याकरीता आपल्यामधून एकाची " नायक" म्हणून निवड करतात. व दुसऱ्या गोत्रातील व्यक्तीला नायकाच्या कार्यात मदत करण्यासाठी " कारभारी" नेमतात. " तांडा " नीतीनियमाचे पालन करून सांभाळण्याची जबाबदारी यांंना पार पाडावी लागते. याकरिता नायक, कारभारी, हासाबी, नसाबी, डायसाणे, ढालीया , नावी, ढाडी इत्यादी लोकांचे योगदान महत्त्वपूर्ण असते. " नायक " जरी तांडा प्रमुख असला तरी पंच पंचायतीच्या मताचा आदर करूनच तो निर्णय देतो, घेतो. पंचाने घेतलेल्या निर्णयाला "तांडा" सहसा विरोध करीत नाही.
" नायक " आणि त्यांचे पंचमंडळ यांच्या नेतृत्वाखाली तांडा त्यांचे सर्व कार्य व्यवस्थित पार पाडत असतो. तांडा नायकाच्या नावानेच ओळखला जातो. त्यामुळे या पदावर राहणाऱ्या व्यक्तीला सामाजिक भान ठेवून निर्णय घ्यावे लागतात. तांड्याची प्रतिमा, प्रतिष्ठा नायक व त्यांच्या पंचमंडळाच्या कार्यकतृत्वावर अवलंबून असते. तांड्यातील सण- उत्सव, सुख- दुःख, वादविवाद यात पंचमंडळाच्या निर्णायाची कसोटी लागत असते.
आजच्या काळात " तांडा " " नायक " आणि त्यांचे पंचमंडळ अस्तित्वात आहेत. परंतु आधुनिकतेच्या नावाखाली त्यामध्ये अनेक चांगल्या -वाईट गोष्टींचा समावेश झालेला आहे. पिढ्यामधील अंतर दूरावत चालला आहे. तांडा इतर समाजाच्या संपर्कात आल्यामुळे अनेक प्रथा पुरातन म्हणून बंद झाल्यात वा इतरांच्या अनुकरणातून नविन परंपरा रुढ झालेल्या आहेत. " तांडा " गाववस्तीच्या बाहेर वास्तव्य करीत होता तोपर्यंत त्यांची समाजव्यवस्था बळकट होती. " लदेणी" बंद झाल्यापासून " तांडा" नागर संस्कृतीच्या संपर्कात आला. आणि नवनवीन बाबींचा तांड्यात प्रवेश झाला. जीवनाचा प्रश्न सोडविताना तांडा आपला सांस्कृतिक ठेवा सुरक्षित ठेवू शकला नाही. असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मागील काही वर्षांपासून गोरधाटी रक्षक विचारवंत, गोर बंजारा संघटना गोर बंजारा गणाचा सांस्कृतिक वारसा पुनर्जीवित करण्यासाठी धडपडत आहेत. " तांडा " आता पुन्हा आपल्या परंपरेला आधुनिक रुपात समाजात रुजविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. निश्चितपणे पुढील काळात " तांडा " एका नविन रुपात जगासमोर आपले वेगळेपण सिद्ध करेल . व प्राचीन काळापासून चालत आलेल्या परंपराना पुन्हा नवा उजाळा देईल हे नक्की सांगता येईल.
आपल्या प्रतिक्रिया comment अवश्य नोंदवा .
किशोर आत्माराम नायक
गोर बंजारा संस्कृती
घणो आचो
उत्तर द्याहटवा