गोर बंजारा तांडा संघटन " नायक " #GorBanjara'sTandasystem " #NAYAK "

       गोर बंजारा तांडा संघटन  

      " नायक "

       गोर बंजारा गणाच्या समाज व्यवस्थेतील तांड्याचा प्रमुख प्रशासक, न्यायदाता व मार्गदर्शक " नायक" हा होय. " नायक" हा शब्द अनेक भाषेत वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. परंतु तांडा " नायक" या नावाला आदराने पाहतो. तांड्याची मान मर्यादा, प्रतिष्ठा नायकाच्या नावाशी जुळलेली असते. तांड्यातील सर्व स्तरातील लोकांना एकत्र ठेवण्याची जबाबदारी नायकाची असते.  तांड्यातील सामाजिक, धार्मिक, आर्थिक अशा सर्व प्रकारच्या कार्यात नायकाची भूमिका महत्वपूर्ण ठरत असते. याच कारणामुळे कदाचित " तांडा " नायकाच्या नावानेच ओळखला जातो. सोमला नायकेर तांडो, आतमा नायकेर तांडो. नायकाच्या तांडा व्यवस्थापनावरच  तांड्याला इतर तांड्यात मानाचे स्थान मिळत असते. विशिष्ट पुजा प्रसंगी नायकाला तांड्याकडून मानाचा "घुंडीवाळो हाडका" दिला जातो. 

      " नायक " पदाचे महत्त्व

      ज्या तांडा समूहात एकापेक्षा अधिक नायकांचे तांडे असतात त्यांच्या संयुक्‍त बैठकीत प्रत्येक नायकाचे पंचमंडळ असते, असावे लागते. या बैठकीचे प्रधानपद कोणत्याही एका नायकाला समाज मूल्यांच्या श्रेष्ठतेच्या दृष्टिकोनातून निवडून दिल्या जाते. मात्र यांच्या बैठकीतील कोणताही निर्णय एकमताने घेतला जात असतो. एकदा नायकाने घेतलेला निर्णय सर्वमान्य समजून तांडा त्यानुसार व्यवहार करत असतो. नायकाच्या निर्णयाला सहसा कोणीही विरोध करीत नाही.

गोर बंजारा तांडा संघटन " नायक"

             तांड्यांच्या बैठकीत कोणत्याही विषयावर निर्णय झाला तर एकमताने नाही, तर प्रश्‍न अनिर्णित राहतो . बहुमतांच्या निर्णयांची कल्पना गणाने कधीही केलेली आढळत नाही. ज्या बैठकीला निर्णयात एकमत झाले नसेल त्या बैठकीपासून नायकाला सावरता आले नाही तर तांड्याला सरळ दोन तट पडतात. ज्या त्या समूहात नायकाचे स्थान सर्वोच्च असते. किंबहुना हा तांडागण " नायक  " प्रधान आहे. तथापि प्रत्येक निर्णय शक्यतो सर्वासमक्ष घेण्याची दक्षता नायक घेतो आणि त्याला पंचमंडळाचा एकमुखी पाठिंबा असतो.

      नायकाच्या होकाराशिवाय कोणताही सण, उत्सव तांड्यात साजरा होऊ शकत नाही. तांड्यातील सोयरसंबंध वर व वधुपक्षाने नायकाच्या साक्षीने जुळवायचे असतात. प्रतिष्ठाप्राप्त नायक स्वेच्छेने हवे त्या मुलीचे लग्‍न हवे त्या मुलाबरोबर जुळवू शकत असे व अनपेक्षित प्रसंगी विच्छेदितही करू शकत असे. घरातील विवाहविषयक कोणत्याही विधीत नायकाची उपस्थिती प्रतिष्ठेची असे म्हणूनच ती अनिवार्य मानले जाई. लग्‍न संबंधातील वधुमूल्य ठरवित असताना नायकाची संमती आवश्यक असे. दुर्बल नायकाला ती दाखवावी लागे. मृत व्यक्‍तीच्या कुटुंबीयांचे सांत्वन जेव्हा दिवाळी, होळीच्या संध्येला  सामूहिक पद्धतीने करतात जेव्हा नायक उपस्थित असावाच लागतो. होळी नृत्य खेळणार्‍या तरुणाच्या प्रमुखाला ‘गेरिया’ ला मानाचा एक रुपया नायकाने द्यावयाचा असतो. तसेच विवाहापूर्वी विधीचे वेळी वर वा वधू पक्षाने (आपल्या तांड्यातील) द्यावयाचा आणि प्रत्यक्ष विवाहप्रसंगी देखील द्यावयाचा एक रुपया स्वीकारण्याचा,व देण्याचा मान नायकालाच असतो.

      होळी, तीज यासारख्या सण उत्सवात प्रथमतः नायकाची परवानगी घेतली जाते. सारासार विचार करून " नायक " यासाठी परवानगी देतच असतो. परंतु तांड्यात जर काही अनपेक्षित घटना घटित झाली तरच नकार दर्शवित असतो .

       "  नायक " निवड 

       नायकाचे पद वंशपरंपरेने चालते. नायक निपुत्रिक मृत्यू पावला तर त्याच्या बहिर्विवाही गोत्रातील सर्वात जवळच्या नातेवाईकाला नायक म्हणून नेमण्यात येते. कधी कधी जुलमी, भिरू, दुर्गुणी  नायकाला जनता, असामी आव्हान देऊ शकते. अशावेळी त्याची जनता ज्याला आसामी म्हणतात ती त्याच्या नेतृत्वातून फुटून वेगळे निघते. " स्वतंत्र नायक " नेमते व नंतर कारभारी पंचमंडळ वगैरे सगळे सोपस्कार होऊन त्याच्या स्वतंत्र राहाटीला " तांडा " म्हणून आपोआप मान्यता मिळते. 

       नव्या नायकाच्या कारकिर्दीची सुरुवात ‘ओरी’ नावाच्या बोकूड-बळी प्रथेने होते. अशा ओरीसाठी एक बोकड विकत घेतला जातो. त्याच्या किंमतीचे तांड्यातील कुटुंबाइतके समान भाग पाडले जातात. नंतर बोकड कापून त्याच्या मांसाचे ही तेवढेच भाग पाडले जातात. तांड्यातील कुटूंबापेक्षा एक भाग ( हिस्सा) जास्तीचा पाडतात. हा अधिकचा एक भाग नायकास मानाचा म्हणून देतात. या भागावर (हिस्स्यावर) बोकडाच्या पायाचे विशिष्ट हाड असते. या हाडाला ‘घुंडीवालो हाडका’ असे म्हणतात. या हाडासह हिस्सा वाट्याला येणे प्रतिष्ठा व बहुमानाचे मानतात. म्हणजेच हा विशिष्ट भाग प्रतिष्ठित व्यक्‍तीलाच मिळतो.

       " नायक " या पदाला असणारी प्रतिष्ठा, मान तांड्याला वैभव प्राप्त करून देते.‌ सद्यस्थितीत आधुनिकतेच्या नावाखाली" तांडा " आणि " नायक " या दोन्ही गोष्टींचा प्रभाव कमी होत आहे. काही तांड्यात अजूनही प्राचीन नीतीनियमाचे कमीजास्त प्रमाणात पालन करून " तांडा " जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न होत आहे. 

आपली प्रतिक्रिया (comment) अवश्य नोंदवा .

       किशोर आत्माराम नायक

       गोर बंजारा संस्कृती 


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोर बंजारा समाज आणि देवीदेवता.. १ Gor Banjara God & Goddess

गोर बंजारा समाज गोत्र.. गोत (पाडा)..‌‌२ Gor Banjara Gotra, Got (pada)

बंजारानामा..... नजीर अकबराबादी #Banjaranama #Nazir_Akbarabadi

गोर बंजारा समाज गोत्र .... गोत पाडा.. १ Gor Banjara Gotra, Got (pada)

गोर बंजारा समाज पुजाविधान.४.. गोटपुजा #Gor #Banjara's #worship method ' #GOTPUJA '

गोर बंजारा समाजव्यवस्था " तांडा" Gor Banjara Social system ' TANDA'

गोर बंजारा समाज आणि देवीदेवता ...२ Gor Banjara God & Goddess