गोर बंजारा समाज आणि धर्म संकल्पना Gor Banjara's Religious consept
गोर बंजारा समाज आणि धर्म संकल्पना
गोर बंजारा गणाच्या धर्मविषयक संकल्पनांचा विचार करताना सर्वप्रथम हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, भारतीय संघ राज्याचा खानेसुमारीत गोर बंजारांना हिंदू म्हटलेले आहे. भारतातील धर्माचा विचार करता जे मुस्लीम, ख्रिस्ती, बौद्ध धर्माचे नाहीत त्या सर्व समाजाची नोंद हिंदू धर्मात करण्यात आली आहे. केवळ मुखेरी बंजारा मुसलमान म्हणून गणल्या जातो. भारतात याशिवाय शिख धर्माचे अनुयायी (आचरणारे) पुष्कळ बंजारे आहेत. आता भारतातील ही खानेसुमारी पद्धती अलीकडील काळातील आहे. तत्पूर्वी बंजारागणाने स्वतःच्या धर्माविषयी काही कल्पना केल्या असतीलच असे वाटणे साहजिकच आहे. पण तसे नाही.
बहुतेक लोकजीवनाप्रमाणे गोरबंजारा गणाचा धर्मविषयक वैचारिक विकास अप्रगत स्वरूपात आढळून येतो. असे असले तरी बंजारा गण लोकांच्या संपर्कात आल्यानंतर स्वतःला हिंदू म्हणवून घेऊन तद्नुरूप शक्तपथी आचरण करीत आला आहे. धर्मकल्पनांचे नियंत्रण कोणत्याही समाजात सामान्यतः धर्मप्रमुखाच्या हाती असते. अशा धर्मप्रमुखांना निरनिराळ्या समाजातून वेगवेगळ्या नावाने संबोधने आहेत. त्यांच्या शिकवणी नुसार समाज धार्मिक व सामाजिक नियमांचे आचरण करीत असतो.
जसे हिंदू धर्मात ब्रम्हा पुत्र मनु च्या धार्मिक विचार प्रवाहाला ग्राह्य मानून धार्मिक व सामाजिक स्तरीकरण निर्माण करण्यात आले आहे. मुस्लीम समाजात पैगंबरांने दिलेल्या आदेशानुसार समाजात नीतीनियम ठरविण्यात आले आहे. शिख धर्मात गुरूच्या गुरूबाणी नुसार तर बौद्ध धर्मात तथागताच्या धम्म मार्गावर समाज मार्गक्रमण करत आलेला आहे.
गोर बंजारा गणाचा विचार करता असा कोणताही धर्म गुरू अथवा धर्मग्रंथ अस्तित्वात नाही. गोर बंजारा गणात गणप्रमुख "नायक" व " पंच पंचायत" ने ठरविलेल्या नीतीनियमाचे अनुसरण हा समाज करत असतो. मऱ्यामा माता तथा सात देवी या व्यतिरिक्त कोणत्याही इतर देवीदेवतांची सार्वत्रिक पुजा, विधी गोर गणात आढळून येत नाही. फार पूर्वी मातृसत्ताक पद्धती या गणात अस्तित्वात असावी त्याचे हे द्योतक.
धार्मिक मान्यता
धार्मिक बाबतीत गोर बंजारा गणात कोणतेही काटेकोर नियम नाहीत. केवळ धर्माचा उपदेश करणारा अस्सल गुरुंचा पंथ बंजारागणात प्रचलित नाही, नव्हता. ‘धर्म’ ही उपासनेची बाब होऊ शकते हेच मुळी या लोकांना अज्ञात होते. गोर बंजारा समाजात इतर समाजातील लोकांना सामावून घेण्याची पद्धत आहे. अशा लोकांना " जांगड" असे म्हणतात. पुढील काळात असे लोक गोर बंजारा गणाचाच एक घटक होतात. अशा लोकांचे काही गोत्र, गोत व पाडे तयार झालेंले आहेत.
गोर बंजारा समाजेचे देवीदेवतांचा विचार केला तर त्याचे स्वतःचे असे ठराविक धार्मिक उत्सव आहेत. जे इतर कोणत्याही धर्मात आढळून येत नाही. समनक, गेर, ओरी, गोट, सती, दसराव, नेवसपाणी, धुंड, दाडो, घटपुजा, मतराल, नवमी, तीज होळी, दवाळी यासारखे सण, उत्सव हा गण साजरा करतो. याचे अवलोकन केले असता हा समाज आदिम काळापासून अस्तित्वात असल्याचा पाऊलखुणा आढळून येतात.
" चोको" धार्मिक विधीसाठी जमीनीवर धान्याच्या पीठाने काढण्यात येणारे चौकोन. " चोको" व्यतिरिक्त कोणत्याही धार्मिक चिन्हाला या गणात स्थान नाही. लिंबाच्या झाडांना गोरगणात " याडीर झाड" म्हणजे देवीचे झाड मानतात. शपथ घेताना, एखाद्याला शब्द देताना लिंबाच्या झाडांची डहाळी हाती घेतात. अशी शपथ गोर बंजारा गण सहसा मोडत नाहीत. सर्वसामान्य ठिकाणी आढळणाऱ्या झाडांना दैवी राप, पवित्र मानण्याचे उदाहरण इतर धर्मात तरी दिसून येत नाही. निसर्गाविषयी गोर बंजारा समाजाला असणाऱ्या आदराचे हे एक प्रमुख कारण असावे. सुख दुःखात निसर्गाच्या सानिध्यात जाणारा गोर बंजारा गण पुर्वीपासून निसर्ग पुजक असल्याचे आढळून येते . देवीदेवता पेक्षा धार्मिक कार्यात गोर गण निसर्गातील घटकांना जास्त महत्त्व देतो. दिवाळीत " बरु, लामडी" नावाचे गवत, होळीत " केसुला" पळस फुल, तीज त्यौहारात " गहू, धान " चोको पुजेत " लिंबाची डहाळी" लग्नात काटेसेवर, पळस, आक, जांभुळ, उंबर, इत्यादी वनस्पती ना पवित्र मानल्या जाते. देवीदेवता, मंदीर, मुर्ती या धार्मिक बाबतीत गोर बंजारा गण कोसो दूर राहीला आहे.
सद्यस्थिती
आजच्या काळात गोर बंजारा गणात इतर धर्मांच्या सानिध्यात, संपर्कात राहिल्यामुळे अनेक धार्मिक बाबी रुढ झालेल्या आहेत. आजच्या काळात गोर बंजारा समाज कधी हिंदू धर्मातील अनेक देवीदेवतांची पुजा अर्चना करत आहे. शिख धर्मांच्या गुरूच्या चरणी डोकं टेकवून नतमस्तक होत आहे. तर कधी मुस्लीम पिराच्या दर्ग्यावर चादर चढवित आहे. धार्मिक लवचिकता असल्या कारणाने आज हा गोर समाज अनेक धर्म प्रचारकांच्या आहारी जाऊन धर्मांतर करत आहे. इतर धर्मांच्या सानिध्यात राहून आता तांड्यामध्ये मंदीर, महंत यांच्या मागे गुरफटायला लागला आहे.
विशिष्ट अशी धार्मिक संकल्पना रूढ नसल्याने गोर बंजारा समाज वेगवेगळ्या धर्मांच्या दावणीला बांधल्या गेला आहे. गोर बंजारा साहित्यिक, गोरशिकवाडी चळवळ यामुळे आपल्या वास्तविक अस्तित्वाची ओळख निर्माण करण्यासाठी गोर बंजारा समाज जागा होत आहे. आपली धाटी, वहिवाट , रिवाज येणाऱ्या पिढीला कळाव्यात, लक्षात रहाव्यात म्हणून प्रयत्नशील आहे.
गोर बंजारा समाजात आज " गोर धर्म" ही धर्माची संकल्पना समोर येत आहे. काही संघटना , विचारवंत यासाठी प्रयत्न करतांना दिसतात. पण विशिष्ट अशी नीतीनियम, रुढी, प्रथा, परंपरा याबाबत जोपर्यंत सखोल अभ्यास करून अंमलात येत नाही. तोपर्यंत तरी हि बाब अस्तित्वात येवू शकत नाही.
किशोर आत्माराम नायक
गोर बंजारा संस्कृती
Good
उत्तर द्याहटवा