गोर बंजारा समाज आणि धर्मगुरू Gor Banjara's Religion & Priest
गोर बंजारा समाज आणि धर्मगुरू
बंजारागणाने स्वतःच्या धर्माविषयी काही कल्पना केल्या असतीलच असे वाटणे साहजिकच आहे. पण तसे नाही. बहुतेक आदिम लोकजीवनाप्रमाणे गोरबंजारा गणाचा धर्मविषयक वैचारिक विकास अप्रगत स्वरूपात आढळून येतो. धर्मकल्पनांचे नियंत्रण कोणत्याही समाजात सामान्यतः धर्मप्रमुखाच्या हाती असते. अशा धर्मप्रमुखांना निरनिराळ्या समाजातून वेगवेगळी संबोधने आहेत. गोर बंजारा गणाचा विचार करता या गणात धर्मगुरू व पुरोहित अशी कोणतीही संकल्पना अस्तित्वात नाही. गोर गणात नीतीनियमाचे उपदेश करणारे ‘गुरु’ व जुजबी सल्ला, मार्गदर्शन देणारे ‘भगत’ असतात. गुरू याला "गरू " असे म्हणतात. यांनी दिलेला सल्ला वा केलेले मार्गदर्शन पाळण्याबाबत कोणतीही बांधिलकी नसते. अशा लोकांच्या अनुभव व सत् विचारांचा आदर केल्या जाते हे वेगळे सांगायला नको. केवळ धर्माचा उपदेश करणारा अस्सल गुरुंचा पंथ बंजारागणात प्रचलित नाही, नव्हता.
गुरुची ख्याती बंजारा लोकसाहित्यात आढळत नाही. ‘लेंगी’ या होळी गीताचे जे ४-५ नमन गीत आढळतात त्यातही गुरुंना (मूळगीतात) नमन केलेले आढळून येत नाही. हे विशेषत्वाने लक्षात येते. गोर बंजारा गणाच्या भजनावलीच्या आद्य नमन गीतात गुरुनमन नाही. मात्र गुरुंविषयी पूज्य भाव व आदर व्यक्त करणारे त्यांची स्तुती करणारे गीत आढळतात. गुरू म्हणून काही धार्मिक गीतात " गरु बाबा" " सामी" यांची नावे येतात पण हे कोण होते याबाबत अनेक मतमतांतरे आहेत.
गोर बंजारा गणातील प्रमुख धार्मिक पदे
१) भगत
देवीचा निस्सीम भक्त म्हणून " भगत " याच्याकडे आदराने बघीतले जाते. गोर बंजारा गणात देवीच्या उपासकालाच ‘भगत’ म्हणतात. अन्य देवतांच्या उपासकाला नव्हे. भगत हा एखाद्या पूजास्थानाचा अधिपती असतो. रोगपिडा परिहारार्थ तो विभूती - अंगारा देतो. पुत्रप्राप्तीसाठी तो एखाद्या स्त्रीला ‘बादा’ देतो. बादा म्हणजे इप्सिताच्या प्राप्तीसाठी नवस बोलणे होय. नवस बोललेल्या उपासकाला विशिष्ट आचार सांगणे व त्याच्या नवसाची फेड संकल्पानुसार करून घेणे असे कार्य तो करतो. ‘बादा’ या शब्दाला ‘नवस बोलणे’ असे म्हणता यईल.
भगताचे दुसरे कार्य म्हणजे - सामूहिक संकटाच्या निवारणार्थ उपासना करून पूजाविधान सुचविणे. बंजारा लोक मानवावरील व गुराढोरावरील साथीच्या रोगाला इतर आदिवासी प्रमाणेच दैवी कोप समजत असत आणि अशा संकटाच्या निवारणासाठी भगत रोगाच्या स्वरूपावरून वेगवेगळ्या देवतेची पूजा सांगत. अशी पूजा भगत आपल्या हाताने करीत. साथीच्या रोगाच्या शमनार्थ भगताने सांगितलेल्या बहुतेक पूजा सबली असतात. गोर बंजारा गणात धार्मिक कार्यात " भगत " व्यक्तीला विशेष असा मानसन्मान दिला जातो. परंतु त्याला कोणत्याही प्रकारचे विशेष अधिकार नसतात. संकटाचे स्वरूप व त्यावरील उपायांची चर्चा नायकाबरोबर करून भगताला धर्मकार्य करून घ्यावे लागे. धार्मिक संकेताचे उल्लंघन करणार्या व्यक्तीस एखादी शिक्षा देखील त्यास करता येत नसे. अशा वेळी त्याला नायकाचीच मदत घ्यावी लागे व नायक नसाबातून शिक्षा जाहीर करी. केवळ आशीर्वाद वा शाप द्यावयास तो स्वतंत्र असे. अर्थात साक्षात्कारी म्हणून ख्याती प्राप्त अशा भगताच्या अर्ध्या शब्दात नायक व रयतेने राहणे आलेच हा भाग अलाहिदा.
२) जाणिया
गोर बंजारा गणात " जाणिया हा दुसरा धार्मिक रुढी, प्रथाची जाणिव असणारा घटक. जाणिया हा शकुनादीची शुभाशुभ फले वर्तविणारा. याला ‘वचारी’ असेही म्हणतात. लोकांनी सतमार्गावर जीवन व्यतीत करावे यासाठी मार्गदर्शन करण्याचे कार्य " वचारी " पार पाडतो. विविध धार्मिक किंवा व्यावसायिक कामाची सुरुवात करताना. अथवा कुटूंबावरिल इष्ट, अनिष्ट संकटाची आगावू माहिती करून घेण्यासाठी " जाणिया" याला पाचारण करतात. स्वप्नांची शुभा, अशुभ फले व शकुनाचे परिणाम यावर या लोकांचा आत्यंतिक विश्वास आहे. जाणिया हा आपल्या अनुभव, व उपासनेच्या आधारे संबंधितांना संकट निवारण्यासाठी विविध प्रकारचे समाधान सांगतो. यामध्ये साधारणपणे देवीची उपासना व पुर्वजांच्या अतृप्त आत्म्याच्या समाधानाशी निगडीत असतात. गोर बंजारा गण या दोन्ही गोष्टी खूप मानत असल्याने सहसा सांगितलेला उपाय टाळत नाही. जाणियाच्या शुभाशुभ वर्तविण्याच्या क्रियेला " समण" घालणे असे म्हणतात.
३) डाकी, डाकण
इष्ट , अनिष्ट शक्तीची आराधना करून त्याद्वारे समाजातील वाईट प्रवृत्तींना नियंत्रित करण्याचे कार्य डाकी , डाकण (चेटकीण) करीत असते. जादूटोणा, करणी करणे यासारख्या गोष्टीवर इतर आदिम समाजाप्रमाणेच गोर बंजारा समाजाचा खुप विश्वास आहे. समाजातील डाकीण, चेटकीण वगैरे दुष्ट जादूविद्या धारण करणार्या व्यक्तीचा शोध लावण्याचे, त्यांना दंडण्याचे जादू सामर्थ्य असणारा व्यक्तीला समाजात अनायसेच भीतीयुक्त आदरभाव प्राप्त होते. गोर बंजारा गणात जादूटोणा करणाऱ्या व्यक्तीला " छु छा वाळो " असे म्हणतात.
एखाद्या चेटकीणीने (बंजारा शब्द डाकण) केलेल्या जादूमुळे कोणाला त्रास, पिडा होते, पण ही जादू कोणी केली हे ओळखणार कोण? हे ओळखण्याचे सामर्थ्य असलेला जो असेल त्याला लोक वचकून असतात. अशा दृष्ट प्रवृत्तींना शोधण्याचे कार्य " छु छा वाळो " जाणिया करीत असतो. त्याने ज्या व्यक्तीला चेटूक करणारी ठरविले असेल त्या व्यक्तीला सर्वसंमतीने दंड दिले जाऊ शकते. मग समोरची व्यक्ती प्रतिष्ठित असो किंवा कोणीही तिला बहिष्कृताप्रमाणे वागविणे, वाळीत टाकणे, तिच्याशी रोटी बेटी व्यवहार बंद करणे, अशा स्वरूपाच्या शिक्षा दिल्या जाऊ शकतात. दुसर्या प्रकारातील " छु छा वाळो" जाणीया हा पुरुष असू शकतो किंवा स्त्रीदेखील असू शकते.
वरील तिन घटका व्यतिरिक्त इतर धार्मिक कार्याशी निगडीत कोणताही घटक गोर गणात अस्तित्वात नाही.
याशिवाय प्रत्यक्ष बंजारागणात ज्याला गुरु म्हणता येईल अशी एकच थोर व्यक्ती होऊन गेली ती म्हणजे- सतगुरू सेवालाल होय. ज्यांनी गोर बंजारा गणाला परिस्थितीकडे डोळे उघडून बघण्याचा मोलाचा संदेश दिला. वास्तविक परिस्थितीची लोकांना जाण करून दिली.
सद्यस्थिती
गोर बंजारा गण आता इतर समाजाच्या संपर्कात आला आहे. हिंदू संस्कृतीच्या साहचर्यामुळे त्यांनी मानलेला गुरुचा प्रभाव व महत्ती यामुळे या लोकांनी बंजारेत्तरातून प्रसिद्ध अलौकिक व्यक्तींना गुरु केलेले आढळते.
एकेकाळी या भगतांना व्यवसाय केवळ धार्मिक कार्य हेच असे. मानवशास्त्राला अशा परिस्थितीसाठी अपेक्षित असलेली धर्मसंघटनेच्या विकासाची विशिष्ट पायरी बंजारा गणाने गाठली होती आणि अशी विशिष्ट पायरी गाठण्यासाठी आवश्यक असलेला धार्मिक विकास त्यांनी साधलेला होता. कालांतराने मालाच्या ने-आणीचा (लदेणीचा) धंदा बुडाला आणि त्यांना विपन्नावस्था आली. साहजिकच धार्मिक कार्य भगतांना जोडधंदा म्हणून करावा लागला. याश्विाय स्वातंत्र्योत्तर काळातील विज्ञाननिष्ठेमुळे मंत्रतंत्राधिष्ठित धर्मकल्पनावरील वाढलेला अविश्वास आणि भगताच्या संख्येतील अमर्याद वाढ या बाबीलाही भगतांचा व्यवसाय बळी पडलेला आढळून येतो. साधू, संत , वैराग्य या गोष्टीला गोर बंजारा गणात कोठेही स्थान नाही. वैराग्य वृत्ती वा अन्य कारणाने उपरती झालेले बुवा लोक बंजारा पद्धतीने भजन, कीर्तन करीत तांडोतांड फिरणारे भटके पोटभरू वगैरे लोकांचा यात समावेश होईल. हिंदू धर्माप्रमाणे आता गोर बंजारा समाजातही संत, महंत यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.
" जाणजो, छाणजो, पचच माणजो " असा मोलाचा संदेश देणाऱ्या सतगुरू सेवालाल महाराज याच्या गोर बंजारा गणात मंदीर, महंतांच्या पायावर डोके टेकवण्याची परंपरा वाढत चालली आहे. गोर बंजारा समाजाचा भविष्यात उज्वल काळ आणावयाचा असेल तर समाजात पुन्हा विज्ञान, निसर्ग व मानवतावादी मुल्याची पेरणी करावी लागेल.
किशोर आत्माराम नायक
गोर बंजारा संस्कृती
छान
उत्तर द्याहटवा