गोर बंजारा समाज आणि देवीदेवता ...२ Gor Banjara God & Goddess

 गोर बंजारा समाज आणि देवीदेवता 

गोर बंजारा समाजात "मऱ्यामा" आणि सप्तमातृक देवीची विशेष करून आराधना, उपासना केली जाते. जसजसा गोर बंजारा समाज नागर संस्कृतीच्या संपर्कात आला. त्यायोगे वेगवेगळ्या देवतांची उपासना अनुकरणातून करणे सुरू केले. परंतु गोर बंजारा समाज इतर कोणत्याही देवतेची जरी उपासना करीत असला तरी जे सण, उत्सव साजरे करतो. त्यावेळी जुन्या धाटीपरंपरेला अनुसरूच करीत असतो. अशा धार्मिक कार्यात नागर संस्कृतीच्या देवतांचा संबंध येत नाही. गोर बंजारा गणात सप्तदेवी नंतर जी दैवतं आहेत त्यात मिठू भुकीया, जंगी-भंगी, लाखा बणजारा, भगवान सेवालाल, जेताभाया, रूपसिंग महाराज, सती सामत दादा, रामचंदसात , सामकी याडीचा नामनिर्देश करता देईल. यातील सर्व पूज्य व्यक्‍तीची गोर बंजारा गणात पारंपारिक पूजा रूढ होण्याची कारणे, त्या त्या व्यक्‍तीची धार्मिक आचरण , सामाजिक प्रतिष्ठा किंवा साक्षात्कारी जीवन संदर्भ ही होत. वरील सर्व पुजनिय व्यक्तीनी आपल्या वास्तविक जीवनात समाजाला नवीन दिशा देण्याचे कार्य केले. गोर बंजारा गण यांनी आपली धाटी, रिवाज व नीतीनियमाचे योग्य अनुसरण करावे याकरीता आपल्या जीवनाचा सुवर्ण काळ व्यतीत केला. गोर बंजारा गणाची दशा आणि दिशा योग्य मार्गाने मार्गक्रमण करावी याकरिता मार्गदर्शन केले. गोर बंजारा गणात पुजनिय अशा थोर विभूतीची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे सांगता येतील.


१) क्रांतिसिंह सतगुरु सेवालाल महाराज

            गोर बंजारा समाजात वंदनीय, पुजनिय अशा महान व्यक्तीचा विचार करता सर्वप्रथम नाव‌ येते , ते म्हणजे क्रांतिसिंह सतगुरू सेवालाल महाराज यांचे. भारत देशातील करोडो बंजारा बांधव " बापु " च्या चरणी नतमस्तक होतात. क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांचा जन्म आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुट्टी तालुक्यातील गोलाल डोडी याठिकाणी झाला. आता ते ठिकाण सेवागड म्हणून ओळखले जाते. "लदेणी" ( मालाची बैलाच्या पाठीवरून ने-आण करणे) करत सेवालाल महाराज यांनी पुर्ण भारतात भ्रमंती केली. समाजात रूढ होत असलेल्या अनिष्ट प्रथा , परंपरा बंद करण्यासाठी प्रयत्न केले." सोतार पालेर खुटा सोता रोवलिजो" असे सांगून लोकांना स्वबळावर स्वतःला सिद्ध करायला पाहिजे अशी प्रेरणा दिली. " छाती करीय वोन सात दियीव " संकटाला न घाबरता धैर्याने सामोरे जाणाऱ्यांच्या सोबत सदैव राहील अशी ग्वाही दिली. " लदेणी" काळात तांडा फिरत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागे.‌ सतगुरू सेवालाल यांनी अनेक प्रसंगी समजूतदारपणे समस्या सोडविल्या तर वेळप्रसंगी तलवार सुद्धा हातात घेतली. 

            गोर बंजारा गण सतगुरू सेवालाल यांंना " भाया, मोतीवाळो, तोडावाळो, बापु, क्रांतिसिंह, ब्रम्हचारी " अशा विविध नावांनी संबोधतात. वर्तमान व भविष्यातील घटनांबाबत त्यांनी सांगीतलेली वचने आजच्या काळात प्रत्यक्षात उतरत आहेत. त्यांच्या शिकवणीची उतरायी म्हणून सेवागड आणि पोहरागड येथे लाखो लोक त्यांच्या चरणी नतमस्तक होतात.

   २) लाखा बणजारा

         सतराव्या शतकात गोर बंजारा गणात लाखा बणजारा नावाचा मोठा व्यापारी होवून गेला. लदेणी काळात ज्यांच्याकडे लाखो बैल आहेत त्याला " लाखा" हे संबोधन लावत. लखीशहा हे नाव 'शाह', 'राय' यांचे शीर्षक आहे म्हणजेच राजा. लखीशाह बंजारा हा केवळ एक आशियाई महान व्यापारी नव्हता तर एक उदार मानवतावादी राजा देखील होता. तांड्यात ४ लाख लोक होते आणि प्रत्येक कुटुंबाकडे माल वाहून नेण्यासाठी शंभर बैल होते. एकूण बैलांची संख्या सुमारे 9 दशलक्ष होती. मोठ्या व्यापारामुळे ते देशातील सर्वात श्रीमंत व्यापाऱ्यांपैकी एक बनले. पशुधन आणि त्यांच्या साथीदारांना सहज पाणी मिळावे म्हणून त्यांनी व्यापारी मार्गावर दर 10 किलोमीटरनंतर विहिरी आणि तलाव बांधले. भाई लाखी यांनी बांधलेल्या तलावांचे आणि विहिरींचे पुरातत्वीय पुरावे आजही देशाच्या अनेक भागात सापडतात.

         " लोहगड" जगातील सर्वात मोठ्या किल्याच्या बांधकामात लाखा बणजारा यांनी महत्वाची भुमिका निभावली.

           गुरु तेग बहादूर यांचे कलेवर ज्यावेळी मुघल बादशहा औरंगजेबने दिल्लीच्या चौकात टांगले त्यावेळी लाखा बंजाराने आपल्या सहकार्याच्या मदतीने ते तांड्यावर आणले. व आपल्या रायसिना तांड्यात राहत्या घरात गुरूच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. शिख धर्मात आजही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. 

    ३) जंगी, भंगी   

         जंगी, भंगी या गोर बंजारा गणातील महापुरुषांना कुळपुरुष म्हणून मान्यता आहे. भुकीया गोत्राची वंशवेल यांच्यापासून सुरू झाली, असे जरी असले तरी सर्वच गोर बंजारा गणातील गोत्र या महापुरुषांचा आदर करतात. संकट समयी तारणहार म्हणून गोर बंजारा गण त्यांची आराधना करतात. प्राचीन काळी " लदेणी " ची खेप उचलतांना प्रथमतः यांची प्रार्थना केल्याशिवाय लदेणी मार्गस्थ होत नसे. आजच्या काळातही गोर बंजारा गण विवाहा सारख्या शुभ प्रसंगी कार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून जंगी भंगी यांच्या नावे पुजा करतात.            

    ४) मिठू भुकीया..

        गोर बंजारा गणातील रॉबीन हूड म्हणून प्रसिद्ध व्यक्ती. उत्तरेकडून दक्षिणेकडे लदेणी येत असताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असे. मिठू भुकीयाने त्याकाळी गोर बंजारा गणावरील संकट निवारण्यासाठी प्रयत्न केले. तांड्यातील बांधवाना कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये याकरिता अहोरात्र मेहनत घेतली. प्रसंगी त्रास देणाऱ्या धनाढ्य लोकांना वठणीवर आणले. लुटीच्या मालातून तांड्यातील संकटे सोडविली . म्हणून आजही गोर बंजारा गणात कोणत्याही मालाची समभाग वाटणी करताना " मिठू भुकीया " नावाने एक भाग राखुन ठेवला जातो.     

   ५) सती सामत दादा

        गोर बंजारा गणात मानल्या जाणाऱ्या देवता मध्ये " सामत दादा" हे एक थोर विभूती. " लदेणी" काळात सतगुरू सेवालाल यांच्या समकालीन. सर्व गोर बंजारा गण जरी यांना मानत असला तरी पालतिया ( चव्हाण )गोत्राचा कुलदैवत म्हणून " सामत दादा" यांना मान आहे. नाशिक जिल्ह्यातील " वटागंळी " हे त्यांचे ठिकाण. दरवर्षी लाखो गोर बंजारा येथे दर्शनासाठी येतात.        

   ६) सामकी याडी

        सेवालाल महाराज यांचा भाऊ बदू नायक. बदूनायकाचा मुलगा जेतालाल. जेतालाल च्या पत्नीचे नाव " सामका " . यालाच गोर बंजारा समाज आदराने " सामकी याडी " असे म्हणतात. गरीब परिवारात जन्मलेल्या या मातेने गोर बंजारा समाजाला आदर्श सुन, पत्नी व आई यांच्या कर्तव्याची महती सांगितली. एक स्त्री आपल्या कुळाचा उद्धार करू शकते. सामकी मातेच्या अंगी असलेल्या दैवी गुणांमुळे गोर बंजारा समाज त्यांना खूप मानतो. उमरीगड येथे त्यांचे भव्य मंदिर आहे.     

   ७) रुपसिंह महाराज   
   ८) रामचंदसात
   ९)धर्मिसात

               इत्यादी देवरूपी व्यक्ती गोर बंजारा गणात पुजनिय आहेत. सेवालाल महाराजांनंतर वर्तमानात झालेले बाल ब्रह्मचारी रामराव महाराज यांनाही मानणारा मोठा भक्त गण आहे. गोर बंजारा समाजात पुर्वज पुजा मान्य आहे. मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून "गोटपुजा " गोरगणात अस्तित्वात आहे. याच संकल्पनेतून गोर गणात अलौकिक शक्ती असलेल्या व्यक्तींना देवता मानण्याची प्रथा रूढ झाली असावी. या थोर संत , महात्म्यांनी दिलेल्या उपदेशाचे पालन करून समाज सृदृढ करण्याचे कार्य येणाऱ्या पिढीला करावे लागेल. 

               याकरीताच " सतगुरू सेवालाल महाराज" यांच्या प्रतिमा वा मुर्तीचे पुजन न करता गोर बंजारा गण त्यांच्या " पगडी , टोप " यांची पुजा करतात.

( आपली प्रतिक्रिया comment मध्ये नक्की नोंदवा)


  संदर्भ:- बंजारा लोकांचा इतिहास.. बळीराम पाटील

     किशोर आत्माराम नायक 

     गोर बंजारा संस्कृती 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोर बंजारा समाज आणि देवीदेवता.. १ Gor Banjara God & Goddess

गोर बंजारा समाज गोत्र.. गोत (पाडा)..‌‌२ Gor Banjara Gotra, Got (pada)

बंजारानामा..... नजीर अकबराबादी #Banjaranama #Nazir_Akbarabadi

गोर बंजारा समाज गोत्र .... गोत पाडा.. १ Gor Banjara Gotra, Got (pada)

गोर बंजारा समाज पुजाविधान.४.. गोटपुजा #Gor #Banjara's #worship method ' #GOTPUJA '

गोर बंजारा समाजव्यवस्था " तांडा" Gor Banjara Social system ' TANDA'