गोर बंजारा समाज पुजाविधान..३. " भोग " #GorBanjara's #worship method ' #BHOG '
गोर बंजारा समाज पुजाविधान...३
" भोग "
गोर बंजारा गणात देवतांना आहुती देण्याच्या दोन पद्धती पुर्वापार प्रचलित आहेत. " #भोग " आणि " #धबुकार" या व्यतिरिक्त देवीदेवतांना नैवेद्य देण्याची वेगळी पद्धत नाही . ' भोग’ हे पूजाविधानही 'धबुकार ' प्रमाणेच वैशिष्ट्यपूर्ण आहे. या पद्धतीचे प्रयोजन पूर्वज व सण या व्यतिरीक्तच्या दैवतांना दाखवायच्या नैवेद्यासाठी आहे. जसे सतगुरू सेवालाल, जेता भाया, श्री लिंगासात गुरू, बालाजी वगैरे. " भोग " साठी घरासमोर अंगणात दाराच्या सरळ रेषेत चरी खोदतात. तत्पूर्वी सडावगैरे टाकून झाडून जागा साफ केलेली असते. या चरीत विस्तव पेटवितात. त्यावर प्रसादाचा पदार्थ " कडाव ( शिरा), खिर, चुरमा, भात यापैकी ज्या देवताची पुजा असेल त्यानुसार " भोग " करीता बनवितात. विशेषत: नैवेद्य, प्रसाद पुरुषंच तयार करतात. येथील सर्व पदार्थ पुरुषाने आणलेल्या पाण्यातच शिजवायचे असतात. पाणी, प्रत्यक्ष चरी वा त्या पदार्थासाठी धुऊन स्वच्छ केलेल्या भांड्याला स्त्रियांना स्पर्श करता येत नाही. चरीतील विस्तव विझू लागल्यास त्याला सूप किंवा कशाने तरी हवा देतात. तोंडाने फुंकून चरीतील विस्तव चेतविणे निषिद्ध मानले जाते. येथे ‘कडाव’ (शिरा) खीर व चुरमा, भात वगैरे पदार्थ नैवेद्यासाठी व प्रसाद म्हणून वाटण्यासाठी केल्या जातात. तयार केलेल्या प्रसादातून थोडा भाग नैवेद्यासाठी पत्रावळ किंवा ताटात टाकतात. ते प्रसादाचे ताट चरीला समांतर ठेवतात. सामान्यतः अंगणाच्या उजव्या बाजूला प्रसादाचे ताट ठेवल्या जाते. पाण्याचे भांडे व तुपाचे भांडे ताटाजवळ असते. नंतर शक्य तेवढ्या लोकांना पूजेसाठी बोलावल्या जाते. बोलविताना घरोघरी न जाता रस्त्याने चालतानाच आवाज देतात.
तांड्यातील स्रि- पुरुष आवर्जून प्रसादासाठी जातात. शक्यतो कोणीही टाळत नाही. जमलेले लोक चर मधोमध घेऊन घरासमोर उभे राहतात. डोक्यावर शेला, रुमाल व हात जोडलेले असावे असा संकेत आहे. अर्धगोलाच्या कोणत्याही एका टोकाला स्त्रियांनी डोक्यावर पदर घेऊन नमस्कार रीत असल्याच्या मुद्रेत बसून रहायचे असते. नंतर पूजा करणारा
“आवो ....बापुर ..भोग लगावा”
(इष्ट देवतेचे नाव घेऊन) भोग लावू नैवेद्य दाखऊ असे म्हणून उपस्थितांची परवानगी घेतो. उपस्थिती लोकातून जेष्ठ (वा प्रतिष्ठित) ‘लगा... लगा ’ ‘लाव, नैवेद्य दाखव’ म्हणून उपस्थितांची परवानगी देतात. मग पूजा करणारा पूजापात्रातील पदार्थात तूप टाकतो व तुपाच्या धारेबरोबर चरीतील विस्तवात नैवेद्याचे एकेक घास टाकीत अशी पाच संख्या पूर्ण करतो. यापूर्वी उदबत्ती, कापूर, ऊद आदी पूजाद्रव्ये पेटवलेली असतात. नैवेद्य अर्पण केल्यावर पूजा करणारा पाण्याचे भांडे डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने दोन वेळ उजवीकडे व एक वेळ डावीकडे पाण्याची धार सोडतो. आतापर्यंत पूजा करणारा वाकूनच धार सोडतो. वाकूनच आपल्या क्रिया करीत असतो. आता उभे होऊन त्याने थोडे पाणी प्रथम दाराच्या दिशेने एक वेळ व थोडेसे प्रार्थनेसाठी जमलेल्या लोकांवर एकवेळ शिंपडायचे असते. असा " भोग " लागल्यावर उपस्थितातील जेष्ठ व्यक्तीलाच ‘आरदास’ म्हणावयास विनंती करतात. आरदास (प्रार्थना) म्हणणारा आरदास म्हणू लागतो. तेव्हा त्याने व सर्व पुरुषांनी उभे राहून आपआपले दोन्ही हात छातीवर जोडलेले असतात.
आरदास
जे जे जे भगवान सेवादास महाराज
बालब्रम्हचारी, निराकारी, भरोसे-भारी-बापू साहेब॥
धोळे घोडेर आस्वारी रेणो। पडी तेग खडी करणो।
खेप वटाव रूपारेन चलाणो। मुई मटीन सरजीत करणो
दी पगार साइ व्हेणो, चार पगार साइ व्हेणो
चारपोर रातेरो चार पोरो तारो रेणो बापु
बागबगिचा फळफलवाडी हरीभरी रकाडणो
धडेरगुणी-साबीद रकाडणो सेरेम सव्वासेर करणो
चुकीभुली कर्बाण करणो
काळे मातेर मनक्या छा पगेपगेम चुकाचा
डायवडेर लज्जा रकाडणो
इ तार नामेर प्रसाद किदे जेन धोळे देवळेम
पूचतो कर लेणो। बापूसाहेब
अशी आरदास संपल्यावर हात जोडून उभे असलेले लोक जमिनीला हात टेकेपर्यंत वाकून नमस्कार करतात व बसतात. मग कोणी तरी एक जण भांड्यातील प्रसादाचा थोडासा पदार्थ ताटात काढून एक घास पूजेच्या पात्रात ठेवतो व आपल्या उजव्या बाजूने प्रत्येकाच्या हातावर प्रसाद देतो. या प्रसादाचा कोणत्याही तर्हेने अवमान होणार नाही याची काळजी घेतल्या जाते. काही वेळाने चर बुजवून टाकतात. तिला ओलांडता येत नाही. किंवा त्यातील विस्तव पाणी टाकून विझवता येत नाही. जीवंत चेतलेल्या विस्तवावर माती टाकून देतात. या भोग विधानासाठी सुर्योदयाची वा गायी-गुरे परतण्याची म्हणजे सूर्यास्तापूर्वीची वेळ प्रशस्त मानतात. चढत्या किंवा डोक्यावरून सूर्य ढळत असतानाची वेळ भोग विधानासाठी निषिद्ध मानतात.
इतर माहिती
वर भगवान सेवादासांची आरदास सांगितलेली आहे. आरदास म्हणजे गोर बंजारा गणाची प्रार्थना होय. या पारंपारिक आहेत. ‘आरदास’ गोर लमाण गणाच्या बहुतेक पुरुषांना येते. पण समूहात जाहीरपणे म्हणावयाचे धाडस सगळ्यांना असतेच असे नाही. ‘आरदास’ अत्यंत डौलदार सरळ सोप्या भाषेत केलेल्या असून त्यातील आशयाचे साम्य ॠग्वेदातील प्रार्थनापर ॠचांच्या आशयासी जुळत असल्याचे आढळते. वर दिलेल्या आरदासाचे पहिले चरण मात्र अर्वाचीन आहे. कारण श्री. भगवान सेवालाल हे संतपुरुष १८ व्या शतकाच्या सुमारास होऊन गेलेले आहेत व प्रस्तुत आरदासीतील पहिले चरण केवळ त्यांच्या संबोधनाचे आहे. कारण प्रत्येक देवतांच्या आरदासचे तोंडवळे वेगळे असते.
गोर बंजारा गणात " आरदास" पवित्र मानल्या जाते. भाषिक अपभ्रंशामुळे थोडाफार फरक आढळतो. परंतु त्यातील मतितार्थ मुळ आहे तोच आजही आढळून येतो. " भोग " लावण्यात येणाऱ्या देवतांची नावे घेवून आरदास बोलल्या जाते. हजारो वर्षांपासून गोर गण देवाची "आरदास" करत आला आहे. ज्ञानदेवांच्या " पसायदानातील ' जे खळांची व्यंकटी सांडो.. तया सत्कर्मी रती वाढो " पद ऐकल्यावर " किडी मुंगीन सायी ... जीवजीनगाणीन सायी वेस " या आरदासातील पदाची आठवण येते. दोन्ही मध्ये जीवनातील अमुल्य तत्वज्ञान सांगितले आहे.
प्रश्न हा उरतो की यापैकी पुरातन कोणते... गोर बंजारा गण बोलतात ती " आरदास" की ज्ञानेश्वराने लिहिलेलं?" पसायदान" खरंच हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. मालाची ने-आण (लदेणी) करत जीवनाचे सार सांगणारं, सर्वांचं कल्याण कल्पिनारं, प्राणिमात्रांच्या बरोबर निसर्गाच्या हित जपणारं अद्भुत तत्वज्ञान गोर बंजारा गणात कसं रुजलं असेल. यावर जाणकारांनी व्यक्त व्हावं. त्यामुळे गोर बंजारा समाजाच्या प्राचीन उज्वल इतिहासाची माहिती उपलब्ध होवू शकते.
( आपली प्रतिक्रिया comment मध्ये अवश्य नोंदवा.)
गोर बंजारा समाज पुजाविधान.. २. दसराव
https://gorbanjarasanskruti.blogspot.com/2023/04/%20%20%20....%20%20%20%20%20.html
किशोर आत्माराम नायक
गोर बंजारा संस्कृती
बढीया
उत्तर द्याहटवाघणो आच माहिती 👍
उत्तर द्याहटवा