गोर बंजारा समाज पुजाविधान..१.. चोको.. Gor Banjara's worship method ' CHOKO '
गोर बंजारा समाज पुजाविधान
चोको
गोर बंजारा गणाला ज्ञात असलेलं एकमेव देवी यंत्र म्हणजे " चोको" . गोर गणात देवी देवतांची वा पुर्वज पुजा करायची असेल तर " चोको" नावचे यंत्र जमीनीवर काढले जाते. " चोको " याला सर्वात पवित्र मानल्या जाते." चोको" काढून ज्या देवीदेवतांची पुजा केली जाते ते देव गोर गणाचे. ज्या देवतांच्या पुजेच्या वेळेस " चोको " काढण्यात येत नाही. ते देवीदेवता गोर गणात इतर धर्मातून आले असे समजणे काही गैर नाही. ज्यादिवशी पुजा करायचे ठरले त्यादिवशी साधारणतः दुपारच्या आधी नाहीतर दुपारच्या नंतर सर्वप्रथम " चोको" नावाचे यंत्र काढतात. घरातील प्रमुख व्यक्ती, भगत वा तांड्याचा नायक यापैकी कोणी एक हे कार्य पार पाडतो. याला " चोको पुरणो " असे म्हणतात. हे यंत्र जोंधळ्याच्या पीठाने जमिनीवर काढायचे असते. घरात काढावयाचे झाल्यास ओटा झाडून ती जमीन गायीच्या शेणाने सारवून घेतात. सुष्ट पुजेसाठी बहुधा असेच करीत असतात. ‘चोको पुरणो’ म्हणजे काढून झाले की, त्यात मध्यबिंदूवर चांदीचे नाणे, दाभण, कवडी, लिंबू, संपूर्ण सुपारी, नागवेलीचे पान इत्यादी वस्तु देवता प्रतिक म्हणून ठेवतात. काही वेळा मध्यभागी ठेवलेल्या नाण्यांवर पाणी भरलेला तांब्याचा (लोटा) गडवा ठेवतात. त्यात लिंबाची डहाळी ठेवतात. वर्तुळात गणितातील अधिकचे चिन्ह (वर्तुळाला छेद पर्यंत) काढले की, ‘चोको’ सिद्ध होतो. चक्र वा चाक पासून त्याची कल्पना बंजारा गणाला सुचली असावी; असे वाटते. त्याशिवाय विवाह समारंभात साक्या नावाच्या चिन्हाचा जो उल्लेख आहे. त्यातून देखील चोकोची उत्पत्ती संभवणे सहज शक्य वाटते. ‘चोको’ अत्यंत पवित्र सिद्ध यंत्र मानल्या जाते.
" चोको " यंत्रामागील संकल्पना
गोर बंजारा गणाने मुळात पृथ्वीचे चा खंड कल्पिलेले आहे. चोकोसाठीवर्तुळाचे ही चार भाग पाडतात. मध्यबिंदूवर ठेवलेली देवता प्रतीके विश्वाच्या अधिष्ठान असलेल्या बंजारा गणाच्या देवता होत. त्या चार ही खंडावर आपली अधिसत्ता ठेवून आहेत; असे मानून मध्यबिंदूवर प्रतिक-प्रतिमांची प्रतिष्ठापना केली जाते. गोर बंजारा गणात आज यःकश्चित समजल्या जाणार्या ‘चोको’ मागे फार पुरातन इतिहास आहे.‘चोको’ यंत्राचा उत्पत्तीक्रम विस्मृतीने लोप पावलेला आहे. असे असले तरी कालांतराने हे देवीयंत्र भगत भोप्यांनीही वापरले आणि तेव्हापासून सुष्ट व दुष्ट दोन्ही पूजेत ते वापरल्या जाऊ लागले.
" चोको" पुजापद्धती
गोर बंजारा गणात ज्या पारंपारिक पुजा पद्धती आहे त्यामध्ये " चोको" आवश्यक असतो. देवीदेवतांची पुजा असेल वा पुर्वजांची. " चोको" काढून होणाऱ्या पुजाविधानात " पशुबळी" देण्याची पुर्वापार पद्धती आहे. कुलदेवतेची पुजा असेल तर माजघरात, इतर गोर गणातील देवता असेल तर त्यांच्या (ठाणो) ठिकाणावर, पुर्वजांची पुजा असेल तर अंगणात " चोको " काढून पुजा केली जाते. देवीदेवतांचे प्रतिक चांदीचे नाणे, अथवा कलदार ( जुना एक रुपया) ठेवल्या जातो. आताच्या काळात देवीदेवतांची चांदीची मूर्ती (टाक) ठेवून पुजा केली जाते.
नियोजित दिवसी चोको पुरून (काढून) सर्व आप्तस्वकीयांना आमंत्रित केल्या जाते. बळी देण्यासाठीचा बोकड आणल्या जातो. कुलदेवतेची पुजा असेल तर दोन किंवा दोनपेक्षा जास्त बोकड असावे लागते. बळी द्यावयाचे बोकूड आणून चोको समोर अंगणात उभे-करतात. त्याला हळद-कुंकू लावतात. मग त्याच्या पायावर डोक्यावर व कानावर पाणी घालतात. एक सगळे लोक हात जोडून बोकडाचे भोवती अर्धगोलाकार उभे राहतात. एका बाजूला स्त्रिया नमस्कार करावयाच्या मुद्रेत बसून असतात. मग ‘विन्ती’ करतात. ही ‘विन्ती’ म्हणजे आरदासचे पूजेसाठी असलेले रूप होय. ती अर्थात आरदास पूर्वकालीन आहे. ती अशी विन्ती :
ल याडी! ल चुकी भुली कर्बाण कर ल!!
बोकडाने धडधडी घेलती की बोकडाचे शीर धडापासून वेगळे करतात. व चोकोच्या मध्ये रेषेवर शीर ठेवतात. नंतर बोकडाचे समोरचे दोन्ही पाय गुडघ्यापासून व मागील पाय मुळापासून आणून तेथे ठेवतात.
त्यानंतर बोकडाच्या विशिष्ट मांसापासून नारेजा करतात. नारेजा म्हणजे हळद व मीठ घालून केलेला ‘उकडा.’ नारेजा प्रमाणेच गव्हाचा चपात्या व कडाई सुद्धा करतात. पाच चपात्यावर कडाई व नारेजा ठेवतात. काही गोत्रात चपाती एवजी पुर्या ठेवण्याची पण प्रथा आहे. चपात्या किंवा पुर्या, कडाई व नारेजा या सगळ्यांना खांड म्हणतात. चार चपाती, चार भागात व पाचवी मध्यबिंदूसमोर परत निखारे ठेवून त्यात धबुकार पद्धतीने नैवद्य अर्पण करतात. नैवद्याचे कडाई- पुरी किंवा चपाती व नारेजा हे सर्व पदार्थ एकत्र कालवून अर्पिण्याची पद्धती आहे. वरती तुपाची धार सोडतात.
प्रसाद तयार झाल्यानंतर सर्व लोक उभे राहून आरदास विन्ति करतात.
" जै जै मऱ्यामा याडी.........( ज्या देवताच्या नावे पुजा असेल त्याचे नाव घेऊन)
इ तार नामेर भोगभंडारो तार देवळेम पुस्त कर .. "
आरदास, विन्ति झाली की, मग उपस्थित लोकांना प्रसाद म्हणून नारेजा देतात. कोणत्याही प्रसादा इतकाच नारेजाबद्दल देखील आत्यंतिक आदरभाव असतो. ‘पूजा’ विधान येथे संपते. मग पुढे बोकड शिजवून इष्ट लोकांना आमंत्रण देऊन जेवावयास बोलावतात.
किशोर आत्माराम नायक
गोर बंजारा संस्कृती
सुपर
उत्तर द्याहटवा