गोर बंजारा गोरबोलीचा सामान्य परिचय #Gor #Banjara #Language #GORBOLI

गोर बंजारा समाज

गोरबोली भाषेचा सामान्य परिचय

        समुहामध्ये राहताना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी हावभाव वा कंठातून निघणाऱ्या विविध प्रकारच्या ध्वनीतून भाषेची निर्मिती झाली. "ठराविक क्रमाने येणाऱ्या अर्थपूर्ण ध्वनीसमुहाला शब्द असे म्हणतात."  "शब्द म्हणजे एखाद्या वस्तूचा, कल्पनेचा दर्शक असा अक्षरसमूह, की ज्यामुळे संबंधित भाषा समजणाऱ्या व्यक्तीस अर्थबोध होतो".  प्रत्येक समुहाने संवाद उपयुक्त अशा ध्वनीला अर्थरुप प्रदान केले. यातून विविध शब्द रचनेची निर्मिती झाली. भाषेची रचना ही लिहीता वाचता येणा-या लोकांकडुन नव्हे तर सर्वसामान्य लोकांकडुनच केली जाते. भारतात अनेक जनजाती वास्तव्यास आहेत. या जनजातीत अनेक प्रकारच्या बोलीभाषा बोलल्या जातात. 

           भारतातील प्राचीन जनजातींमधील " गोरबंजारा " ही एक प्रमुख जात आहे. मुख्यत्वे भारतातील सर्व प्रांतात जवळपास पन्नास नाव -उपनावाने गोरबंजारा समाज ओळखल्या जातो. ज्यांची लोकसंख्या देशात जवळपास बारा कोटी पेक्षा जास्त आहे . भारत देशातील गोर बंजारा असा समाज आहे ज्यांची बोली, वेशभूषा, गोत्र, राहणीमान हे एकसारखेच आहे. गोर गणसमाज आजही विभिन्न प्रांतात असलेल्या आपल्या जातभाईंना आपल्या मातृबोलीत " गोरमाटी " भाषेत बोलतात. विशीष्ट वेषभुषा, केशभुषा , विविध सण, उत्सव ज्यामुळे त्यांची आपली स्वतःची ओळख आहे, ती आजही सुरक्षित आहे. दुसरी महत्वपुर्ण गोष्ट म्हणजे आजही गोत्राच्या (गोत) आधारेच लग्नसंबंध जुळवीण्यात येतात असा हा एकमात्र गोरबंजारा गणसमाज आहे. 

गोर बंजारा गोरबोलीचा सामान्य परिचय #Gor # Banjara #Language #GORBOLI

            भारत देशात सामान्यतः व्यवसाय (धंदा) या आधारावर जात कोणती आहे हे ठरते . बनज करणारा बंजारी, त्यात लवन (मीठ) व्यापार करणारे लभान, लंबाडा, गाय बाळगणारे गवारिया, गराशिया अशा व्यावसायिक नावाने ही जमात ओळखली जाते. वास्तविकतः बंजारा हे नाव अरबी, फारसी लोकांनी यांना दिले आहे. हे आपआपसात हा समुदाय बंजारा नाहीतर " गोरमाटी " नावाने आपली ओळख देतात . 

        " संस्कृत मध्ये  गो म्हणजेच गाय-बैल यांची राखण करणारे यांना पाळणारे म्हणजेच गोर समजले गेले . पुढे यांचे वंशजांनी गोर हे नाव धारण केले." असे मत “आदि भारत” मध्ये श्रीपाद डांगे  यांनी मांडले आहे. पण ते सर्वथा चुकीचे आहे. " गोर " हे नाव गोरमाटी समाज पुर्वीपासून धारण करीत आला आहे. गोर बंजारा स्वतःला " गोर" व इतरांना " कोर " म्हणून संबोधतो .

        गोरमाटी, गोर-माणसाची बोली म्हणजेच गोर बोली. माटी-म्हणजे मनुष्य . यांची मातृभाषा गोरबंजारा बोली आहे. प्रातांपरत्वे भाषेच्या प्रभावाने त्यात थोडाफार बदल दिसून येतो. परंतु मुळ गाभा तोच आहे.  

        “ गोरबंजारा बोली " 

        डॉ इब्राईम ग्रिर्यसन यांनी आपल्या भाषा सर्वेक्षण ग्रंथात पहिल्यांदा बंजारा, लंबाडा, बोलीचा उल्लेख केला आहे. “स्वतंत्र भारतातील जाती तथा भाषांची समस्या”- बोरीस क्लूयेव, अनुवाद नरेश बेदी यांनी उत्तर दक्षिण भारतात बोलली जाणारी बंजारा, लंबाडी बोलीभाषेचा अभ्यास केला आहे. डॉ इब्राईम ग्रिर्यसन च्या नंतर डॉ.गणेश देवी या बोलीभाषा संरंक्षण करत आहेत ज्यामुळे भारताची जिवीत बोलभाषेची संख्या समोर येऊ शकेल. 

        कोणत्याही बोली भाषेचा उदय-विकास यांचा अभ्यास करण्यासाठी भुगोल आणि मानव वंश याचे ज्ञान असणे जरुरीचे आहे. गोरबंजारा बोली भाषेचा प्रकृति,पाणी, वायु यांचा आधार घेऊन व संस्कृतीच्या अभ्यासातुन अशी माहीती मिळते कि, गोरबंजारा यांचे मुळस्थान गोर स्थान, गोरबंद नदी तथा गोर डोंगराळ म्हणजेच सिंधु घाटी सभ्यता यांचा भूभाग आहे. जो आज अफगाणिस्तान मध्ये येतो. रक्त, नाक, कपाळ व हाडांची मापे यावरुन असा निष्कर्ष निघतो की, बंजारा गोर वंशी ही आदीम जमात आहे. गोरबोलीचे मुळ रुप, ध्वनी, स्वरांचे वर्गीकरण , रुप विज्ञान, व्याकरण , अर्थ विज्ञान, पारीवारीक वर्गीकरण करता येते. गोरबोली ही मुळ भारतीय भाषा परिवाराची बोली आहे. तात्पर्य बंजारा समाज कित्येक शतकांपुर्वीपासुन जगाच्या पटलावर वास्तव्य करत आलेला आहे. समुह करून राहताना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी हावभाव, ध्वनी यांचा संप्रेषण म्हणून वापर केला गेला. गोर बंजारा समाजात आपल्या (समुह) तांड्यामध्ये अंतर्गत व्यवहार व बोलाचालसाठी ज्या बोलीचा उगम झाला ती " गोर बोली " होय .

              भाषा वैज्ञानिक मानतात की जगात सात हजार भाषा जीवंत आहेत. आज भारतात २२ भाषांना मान्यता आहे. २००१ च्या जनगणनेच्या आधारावर १२२ भाषा प्रचलीत आहेत. तर आपल्या देशात मातृभाषेची संख्या १६५२ मानली जाते. 

              “ गोरबंजारा बोलीचे विभाजन ” 

              देशातील सर्व प्रांतात बंजारांचे तांडे कमीअधिक प्रमाणात दिसुन येतात. गोलबोली व त्यावर राजभाषेचा परिणाम मोठया प्रमाणावर दिसून येतो . उत्तर मध्य भारत ज्यामध्ये पंजाब, हरियाना, दिल्ली, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र (आर्यभाषा प्रांत). दक्षिण भारतामध्ये आंध्र, कर्नाटक, गोवा, आणी उत्तर तामीळनाडू – (द्रविड भाषा प्रांत). विदेशामध्ये पाकीस्तान, बलुचीस्थान, अफगाणिस्तान, सिंधमध्ये गोरबंजारा बोली बोलली जाते. स्थानिक तसेच राजभाषेचा परिणाम झाल्यामुळे स्थानिक भाषेचा प्रभाव गोरबोलीवर दिसुन येते.               

              महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, गोवा, उत्तर तामीळनाडू मध्ये बंजारा बोलीवर सामान्यतः दहा टक्के परिणाम स्थानिक भाषेचा झाला आहे. नव्वद टक्के मूळ बंजारा बोली आणि लोकसाहित्य इथे आजही सुरक्षीत आहे. तर मध्यप्रदेश, छत्तीसगड, पुर्व गुजराथ आणि दक्षिण राजस्थान मध्ये बंजारा बोलीवर २० टक्के परिणाम झालेला असुनही बंजारा ८० टक्के बंजारा बोली व त्यांचे लोक साहित्य जीवंत आहे. पंजाब हरियाना उत्तर राजस्थान, पश्चिम गुजराथ मध्ये बंजारा बोली तांडयावर आजही बोलली जाते. तर शहरात राहणारे बंजारा बोलीवर गुजराथी,राजस्थानी भाषेचा परिणाम जास्त झाल्यामुळे मुळ बंजारा बोली मिश्रीत स्वरुपात इथले लोक बोलताना दिसुन येते. पंजाब हरियाना , दिल्ली, ओरीसा ग्रामीण भागात बंजारा बोली बोलली जाते तर शहरात व महानगरामध्ये वसलेले गोरबंजारा,बंजारा बोली समजतात पण स्पष्टपणे बोलु शकत नाहीत. उत्तर भारतामध्ये बंजारा बोली नाममात्र राहीली आहे. नवीन पीढी बंजारा बोली पूर्णतः विसरुत चालली आहे.केवळ जात प्रमाणपत्रावर बंजारा जात लिहीत आहेत. बंजारा बोली व हिंदी भाषेमध्ये समानता अधिक असल्यामुळे उत्तर भारतामध्ये बंजारा बोली वर हिन्दी भाषा मिश्रीत होण्याचे प्रमाण अधिक आहे. दक्षिण भारतामधील भाषा व बंजारा बोली यात विषमता जास्त आहे. त्या कारणास्तव तेथे मुळ बंजारा बोली जिवंत आहे. दक्षिण भारतामध्ये बंजाराबोली मुळरुपात पूर्णतः जीवित आहे. विशेषतः बंजाराबोली आणि लोकसाहित्यावर खुपमोठे साहित्य लिहीले जात आहे. बंजारा बोलीची आपली कोणतीही लीपी नसल्या कारणाने दक्षिण भारतामध्ये तेलगु तामिळ, कन्नड आणि मराठी लिपी मध्ये बंजारा साहित्य लिहीले जात आहे. महाराष्ट्रात बंजारा लिपी ही देवनागरी भाषेत लिहीली जात आहे. बंजारा बोलीमध्ये आतापर्यंत भारतामध्ये अनेक चित्रपट, लघुपट, गीत, संगीत निर्माण झालेले आहेत.त्याच प्रमाणे दक्षिण भारतामध्ये बंजारा बोली स्थानिक भाषेतील बरेचशे शब्द आपल्या बोलीमध्ये आणुन एक प्रकारे बंजारा बोली समृध्द करण्याचा प्रयत्न दक्षिण भारतात होत आहे. बंजारा बोली आणि तिचे साहित्य अन्य भाषेचा परिणाम होऊन सुध्दा आपल्या वेगळया बोलीच्या रुपात आपली स्वतंत्र ओळख दक्षिण भारतातील बंजारा बोलीत आढळुन येते.

“बंजारा बोलीचे रुप-स्वरुप” 

            बंजारा बोलीवर भाषा विज्ञान तथा भाषाशास्त्र च्या खोलातुन अभ्यास झालेला नाही. भिमणीपुत्र मोहन नायक यांनी " गोर बंजारा सामाजिक लोकजीवन आणि भाषा विज्ञान , डॉ. रमेश आर्या यांचे " गोर बोली अपने आप सिख" डॉ. सुभाष राठोड यांचे "बंजारा समाज गोरबोली आणि मौखिक वाड्:मय" , प्रा. दिनेश राठोड यांचे स्फुटलेख यातून गोरबोली व्याकरण दृष्टीने स्वयंसिद्ध आहे हे स्पष्टपणे सिद्ध केले आहे. अनेक साहित्यिक गोरबंजारा साहित्यिक लोकसाहित्यावर अनुसंधानात्मक अभ्यास करत आहेत. परंतु बोलीवर शेाधकार्य म्हणावे तसे झालेले पहावयास मिळत नाही. डॉ.नेमीचंद जैन ने " भीली का भाषा शास्त्रीय अध्ययन " ज्या आवडीने केले आहे ते एक आदर्श भारतीय बोलीचा अध्ययन ग्रंथ आहे. याच ग्रंथाला आदर्शग्रंथ मानुन गोरबोलीचे अध्ययन या प्रमाणेच होणे जरुरीचे आहे. गोरबंजारा लिपी जरी नसली तरीही आज मौखिक संवादातून सुरक्षीत राहीली आहे. गोरबोलीचे स्वरुप पाहुन माहीत पडते की, इंडो-आर्यन बोलींमधील " गोरबोली" ही एक प्राचीन बोली आहे. आजपर्यंत बदलत्या रुपामध्ये पण जीवित आहे. याचे महत्वपुर्ण कारण म्हणजे अन्य समाजापासुन " तांडा " दुर रहात आलेला आहे. " आपण भले व आपला तांडा भला " . यामुळे नागरी भाषेपासुन दुर राहील्यामुळे ती प्रवाहीत होत आली आहे. तसे या जमातीतील तांडे लदेणी व्यापारासाठी अठराव्या शतकापर्यंत देश-विदेशामध्ये फिरत राहीले ज्या मुळे देशी-विदेशी शब्द पण बंजारा बोलीत दिसुन येतात.

         बंजारा मातृबोलीला जीवंत ठेवण्याचे काम जर कोणी केले असेल तर ते बंजारा माता भगीनींनी. गोरबंजारा स्त्री ही आता सुध्दा अन्य कोणत्याही भाषेच्या व्यक्ती सोबत गोर बोली मध्येच बोलते. बाजार हाट (बाजार) करतांना ती बंजारा बोलीचाच वापर करते, ज्या मुळे लाभ तर झाला आणि हानी ही झाली जसे की, जात लपवण्याची प्रवृत्ती काही गोर बंजारांमध्ये निर्माण झाली. आपली जात ओळखु येवू नये म्हणुन गोरबोलीमध्ये सार्वजनीक रुपात वापर कमी झाला. त्याचे दुसरे एक कारण म्हणजे बंजारा जात इ.स.१८७१ च्या कायदयाने जन्मजात गुन्हेगार जमात घोषीत केली होती. बोलण्यावरुन जात ओळखली जाते. पोलीस येऊन पकडुन नेतील या कारणामुळे सुध्दा बंजारा बोलीत बोलण्यासाठी बंजारा लोक घाबरत.

        बंजारांची देशात तत्सम तथा उप जाती

         विभिन्न व्यवसायाच्या, धंद्याच्या कारणामुळे सुध्दा गोरबोलीच्या उपबोली निर्माण झाल्या आहेत. ढाढी, ढालीया, लभान, सनार, नाव्ही, जोगी, भाट, बामणिया, बाजीगर, कांगसी, सुगाली, गंवारीया, लमाणी, लदेणिया, आदि. इतर भाषेच्या वापराबरोबरच गोर बंजारांनी धर्मांन्तर केल्यामुळे भाषेत बदल झाला. जसे शिख _गुरुमुखी, इसाई_इंग्रजी , मुस्लीम_ऊर्दु चा परिणाम बंजारा बोलीत दिसुन येतो. अन्य भाषेच्या संपर्कात आल्यामुळे  उच्चारण पध्दतीचा परिणाम बंजारा बोलीवर झाला आहे. परंतु अर्थ बदलला नाही.

           भाषा अभ्यासक डॉ. गिर्यसन यांनी आपल्या भाषा सर्वेक्षण ग्रंथामध्ये बंजारा, लमाणी बोलीला भ्रमणशील बोली असे म्हटले आहे. ज्यामुळे त्याला राजस्थानी बोलीचे पश्चिमी रुप मानले जाते. भाषा सर्वेंक्षक डॉ.उदय नारायण तिवारी , डॉ.प्रेम प्रकाश रस्तोगी भाषाअभ्यासक गोर बंजारा बोलीला राजस्थानी बोली मानतात. भाषा विज्ञान डॉ.देवेन्द्र कुमार शास्त्री आपल्या भाषा शास्त्र आणि हिन्दी भाषा की रुपरेखा नावाच्या ग्रंथामध्ये  बंजारा बोलीचा उल्लेख करतात . डॉ. भोलानाथ तिवारी बंजारा बोलीला पंजाबी मिश्रीत एक बोली मनतात. भाषा विज्ञान शब्दकोष डॉ. राजेंद्र व्दिवेदी आपल्या "भाषा विज्ञान "ग्रंथात लंबाडी बोलीचा उल्लेख करतात. "राजस्थानी भाषा के अध्येता" डॉ.सिताराम लालस प.राजस्थानी हिन्दी लभ्भानी बोली चा संदर्भ देतात.  हिरालाल शुक्ल आपल्या "जनभाषा और साहित्य " नामक ग्रंथामध्ये गोर बंजारा बोलीला आर्यभाषा सामुहीक परिवाराची बोली मानतात.  घुम्मकड शास्त्र चे लेखक राहुल सांकृतांयन बंजारा बोलीला राजस्थानी बोली मानतात. आज बंजारा बोलणा-यांची संख्या देशात बारा करोडच्या जवळपास असुनही राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला नाही. बंजाराबोली विकासासाठी देवनागरी लिपीमध्ये पाठयपुस्तके तयार होत आहे, ज्या मुळे बंजारा बोलीचा विकास होऊ शकेल. राजभाषेचा दर्जा प्राप्त होईल व तीचे अस्तीत्व जास्त काळ टिकुन राहील. सतत भटकंतीच्या कारणामुळे ती व्दिभाषीय बनली आहे. शासकीय आधार मिळाला तर बंजारा बोलीला नवचैैतन्यप्राप्त होईल. व गोरबोलीतील  बोलणाऱ्यांच्या संखेत वाढ होत राहील.

           संत कबीरांनी म्हणल्याप्रमाणे "चार कोस पर पानी बदले दस कोस पर बानी". बंजारा घुम्मकड असल्याने भारतीय बोली भाषेचा परीणाम बंजारा बोलीवर दिसुन येतो. जसे महाराष्ट्रात मराठी, गुजराथ मध्ये गुजराथी, राजस्थान मध्ये राजस्थानी, मध्य प्रदेशात हिन्दी, कर्नाटकात कानडी, आंध्रात तेलगु या भाषेतील शब्द बंजारा बोलीने ग्रहण केले आहे. आजकाल इंग्रजी शब्दही बंजारा बोलीत येऊ लागले आहेत.  डॉ. गणेश देवी साहित्य अकादमी हे बोलीभाषा संवर्धन या प्रिय विषयावर काम करत आहेत. कोणत्याही जाती जमातीतील पंथ, धर्म संप्रदाय सण-समारंभ रितिरिवाज सामाजिक, सांस्कृतिक , पारिवारीक, संस्कार-सभ्यता आणि संस्कृती समजण्यासाठी व ओळखण्यासाठी त्यांची बोली ही एकमात्र किल्ली आहे. तरीपण धर्मांतरापासुन आपल्या संस्कृती, इतिहास आणि बोलीवर परीणाम झालेला दिसुन येतो.

         गोर बंजारा संस्कृती

         किशोर आत्माराम नायक 

संदर्भ:-१) भिमणीपुत्र मोहन नायक " गोरमाटी संस्कृती आणि संकेत 

           २)डॉ.गोवर्धन बंजारा अहमदाबाद, गुजरात स्फुटलेख 

           ३) डॉ. सुभाष राठोड " बंजारा समाज_ गोरबोली आणि     

               मौखिक वाड्:मय

            ४) डॉ. गणपत राठोड " बंजारा लोकगीतोका सांस्कृतिक अध्ययन 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोर बंजारा समाज आणि देवीदेवता.. १ Gor Banjara God & Goddess

गोर बंजारा समाज गोत्र.. गोत (पाडा)..‌‌२ Gor Banjara Gotra, Got (pada)

बंजारानामा..... नजीर अकबराबादी #Banjaranama #Nazir_Akbarabadi

गोर बंजारा समाज गोत्र .... गोत पाडा.. १ Gor Banjara Gotra, Got (pada)

गोर बंजारा समाज पुजाविधान.४.. गोटपुजा #Gor #Banjara's #worship method ' #GOTPUJA '

गोर बंजारा समाजव्यवस्था " तांडा" Gor Banjara Social system ' TANDA'

गोर बंजारा समाज आणि देवीदेवता ...२ Gor Banjara God & Goddess