गोर बंजारा तांडा संघटन ' ढालीया, धाडी, नावी ' Gor #Banjara Tanda system ' DHALIYA, DHADI, NAVI '
गोर बंजारा तांडा संघटन
ढालीया, धाडी, नावी
तांड्यामध्ये " नायक" व त्यांच्या पंचमंडळाच्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी एक छोटासा गणाचा गट कार्यरत असतो. यात " ढालीया, धाडी व नावी (न्हावी)" यांचा समावेश होतो. निरोप पोचविणे, निरोप आणणे, मंगल कार्यात वा दुःखद प्रसंगात विविध लहानसहान कामे करणे. विविध प्रसंगी ( डफडा) वाद्य वाजविणे. स्तुतीपर कवनाचे गायन करणे. अशी वेगवेगळी कामे हा समुदाय पार पाडत असतो. तांड्यात लहानमोठा असा भेदभाव न बाळगता हा समुदाय सर्वांच्या उपयोगी पडतो. तांडाही या समुदायाच्या उदरभरणाची पुर्ण जबाबदारी उचलतो. अनादी काळापासून हा गणसमाजाचा अविभाज्य भाग बनला आहे.
ढालीया
नायकाचा प्रत्येक काम ऐकणारा व बिनदिक्कतपणे कार्य पार पाडणारा दुय्यम दर्जाचा सहकारी " ढालीया" होय. तांड्याच्या सेवेत दिवसरात्र तत्पर असणारा कार्यकर्ता. प्रामुख्याने नायकाच्या अधीन असणारा. तांड्यात होळी, दवाळी, तीज, विवाह, साडी, गोळ, सगाई, मरणधरण अशा आवश्यक प्रसंगी वाद्य " डफडा " वाजविणे. नायकांचे निरोप घरोघरी देणे, आसामीच्या घरातील मंगल वा मृत प्रसंगाचे निरोप दूसऱ्या तांड्यावरील नातेवाईकांना पोचविणे, नसाब व मळाव अशा बैठकीची सूचना देणे अशाप्रकारची कामे " ढालीया " करतो. तीज, होळी, विवाह प्रसंगी विविध नृत्याच्या चालीवर " डफडा" वाजवून तांडा जीवंत ठेवण्यात ढालीयाची भुमिका प्रमुख ठरते.
तांडा संघटन |
मृताचे संस्कारात व विवाह प्रसंगीच्या विविध विधीनुरूप तो कुटुंबाच्या सामाजिक, आर्थिक दर्जाच्या मानाने ठराविक पद्धतीने दान मागू शकतो. तो त्याचा हक्क आहे. तांडा ही त्याच्या कुवतीनुसार त्याला मदत करतो. " ढालीया" ला देण्यात येणाऱ्या या दानाला " चालतो धरम " असा शब्दप्रयोग वापरला जातो.
धाडी
" धाडी" ढालीया प्रमाणेच तांड्यात असणारा नायकाच्या दुय्यम सहाय्यक गटात मोडणारा गण. नायकाचे संदेश-निरोप पोहोचविणे, नायकाच्या कुलवृत्तांतावर, तसेच प्रतिष्ठीतांच्या पराक्रमावर व ऐतिहासिक कर्तृत्ववान म्हणून पूज्यता पावलेल्या व्यक्तींच्या चरित्रावर ‘गोर बोलीत’ (बंजारा बोलीत) गाणी रचणे, गाणे ही त्यांची कामे होती. किंजरी ( सारंगी) नावाचे त्याचे आपले असे एक तंतू वाद्य ते वापरतात. त्यांच्या गाण्याला ‘हारजय’ ‘भावण’ ‘दोयरा’ वगैरे गीतप्रकार निदर्शक शब्द बंजारा बोलीत आहे. कधीकाळी तांड्यातल्या प्रतिष्ठीत व्यक्तीच्या उपवर (किंवा विवाह योग्य) मुलामुलींसाठी स्थळ पाहून ते परस्परांना सुचविण्याचे काम यांच्याकडे होते. फार प्राचीन लोकथेतून ‘नवरदेव मुलासोबत एकएकट्या ‘धाडी’ ने वर्हाड म्हणून जाऊन लग्न पार पाडून आणण्याचे काम त्यांच्यावर होते व सर्व सोयरसंबंध (वाङ्निश्चय) परस्पर जुळविण्याचे अधिकार धाडींना होते, असेही उल्लेख आढळतात. प्रत्येक टांडयात एक तरी धाढी कुटुंब असे. एकीकडे तो किंगरी नावाचे वाद्य वाजवून मनेारंजनासोबत सर्व गोरबंजारा गोत वंशाचा इतिहास मौखीक रुपाने सांगत असे. धाढी आपल्याला पृथ्वीराज चव्हाणच्या दरबारातील कवी चांदभाटचे वंशज मानतात.
" धाढी" तांड्यातून पूर्वजांच्या पराक्रमाची गाणी गात फिरताना आढळत असत. अजूनही क्वचित आढळतात. मौखिक माहितीवरून ते बंजारा कुळाचा गोत्र गट वृत्तांतही सांगतात. पण त्यावरून व तेवढ्याच वृत्तीसाधर्म्यावरून हे लोक रजपूतोच्या भाटामधून आलेले आहेत. असे मानण्याचे कोणतेही कारण नाही. बंजारा गणाच्या समाज व्यवस्थेला गीत रचून भटकत भटकत गाऊन उपजिविका करणारा एक गोरगण असे तिचे स्वरूप होते. हिंदी साहित्यातून खास बंजार्याचे म्हणून ओळखले जाणारे तंतू वाद्य कींजरी ( सारंगी) हे यांचेच आहे.
नावी ( न्हावी)
" नावी " आपला मुळ पुरुष वासी असे मानतात. स्त्रीया प्रमाणे गोर बंजारा पुरुषाला डोक्यावरील केशभुषा करण्याची आवड होती. त्यावेळी नाव्ही त्यांची पारंपारीक केस रचना ठेवण्याचा प्रयत्न करीत. बंजारा लोकांचे केस विशिष्ठ पध्दतीने कापून देण्याचे काम " नाव्ही " करीत . या केशभुषा प्रकाराला " झलपा " असे म्हणत असत. ही केस (कटींग) ठेवण्याची एक पध्दत. चार-दोन तांडे मिळुन एक "नाव्ही " कुटुंब टांडयासोबत ठेवत असे. भारतात तसेच राज्यात त्यांचे स्वतंत्र असे तांडे पण असल्याचे दिसुन येते.
सद्यस्थिती
गोर बंजारा लोकातील इतर लोकात यांचा बेटी व्यवहार होत नसे. ‘रोटी, बेटी’ व्यवहारावरील बंधन किंवा त्याबाबतच्या संकेत पाळला जात असे. इथे एक लक्षात घेतले पाहिजे की, गोरबंजारा गणाच्या तांडयातील जे घटक मानले जातात. त्या सर्वांत पूर्वी बेटी व्यवहार नव्हता. आता अलीकडे व्हावयाला लागला आहे. व्हायला हवे आहेत. कारण सर्व लोक एकाच संस्कृतीचे घटक असून केवळ व्यवसाय, आर्थिक स्थिती व रूढ अज्ञान या परिस्थितीजन्य अनेक घटकामुळे यांच्यातली उच्चनीचता निर्माण झालेली आहे. ती तत्कालीन अज्ञानावर आधारलेली असल्यामुळे चुकीची आहे. आता त्यात बदल घडून येत आहे.
आजच्या काळात " तांडा" आणि " तांडा संघटन" मोडकळीस आलेला आहे. आधुनिकता व नागरीकरणाच्या नावाखाली तांडा व्यवस्था टिकवून ठेवणे कठीण जात आहे. नवनवीन कायदे आणि तंत्रज्ञानाच्या युगात प्राचीन काळापासून आलेली " तांडा व्यवस्था" काही ठिकाणी आजही काही प्रमाणात अस्तित्वात असलेली दिसून येते.
गोर गणातील " धाटी " नुसार जगजीवन चालू ठेवणे आता शक्य नाही. तरीपण त्यात सुधारणांचा समावेश करून सर्वसमावेशक नियम निर्धारित करण्यात आले . तर येणाऱ्या काळात गोर बंजारा " धाटी , तांडा " अजूनही हजारो वर्षांनंतर जगाच्या पटलावर अस्तित्वात राहू शकतो.
खुप छान
उत्तर द्याहटवाकुप छान
हटवाजय सेवालाल 🙏🙏