गोर , गोरमाटी आणि गोरबोली #Gor, #Gormati #Gorboli
गोर बंजारा
गोरबोली आणि भाषा सौंदर्य
संस्कृती आणि भाषा हे मानवी समाजाचे वैशिष्ट्यपूर्ण भाग असल्याचे मानल्या जाते. संस्कृतीचा ठेवा जतन करण्यासाठी भाषा उपयोगी ठरते. इतिहास आणि संस्कृती यांचा वारसा प्रत्येक समाज आपल्या बोलीभाषेत दर्शवित असतो. " गोरबोली" सुद्धा याला अपवाद नाही. भाषा सौंदर्य आणि व्याकरण दृष्टीने स्वयंसिद्ध अशी गोरबंजारा गणाची " गोरबोली" आहे हे स्पष्टपणे दिसून येते. सिंधू संस्कृती कालीन अनेक घटकाशी गोरबंजारा संस्कृती व बोलीभाषेत साधर्म्य आढळून येते. परंतु पाहिजे त्या प्रमाणात अजूनही त्यावर संशोधन झाले नाही.
" गोर" या शब्दाची उत्पत्ती चा प्रवास अनेक साहित्यिक गो म्हणजे गाय आणि र म्हणजे रक्षण असा घेतात. परंतु " गोरमाटी" या शब्दाच्या उत्पत्तीला भौगोलिक संदर्भ आहे. गोर प्रांतात, प्रदेशात वास्तव्य करीत असलेला तो " गोर + माटी (माणूस)" . प्रकृतीच्या नैसर्गिक घटनांचे अवलोकन करून त्याचे अनुकरण करण्याची गोरगणाची जीवनप्रणाली आहे. गोरैया (House Sparrow) या पक्षाकडून गोरगणाने सहचर जीवनाचा वसा उचलला आहे. गोरैयाला गोरमाटी " चलोकडी" असे म्हणतात. हजारो वर्षांपासून आजपर्यंत "गोळ खायरो (साखरपूडा) , विया (विवाह) , तीज चलोकडीर डोणा ( द्रोण) या संस्कार, उत्सवात गोरमाटी चलोकडीला महत्व देतो. पती-पत्नीच्या सहचर जीवनाचा वसा गोरगणाने चिमणा पक्षाकडून स्विकारला असावा. निसर्गाच्या अनेक ज्ञात अज्ञात घडामोडीचे अनुकरण गोरमाटी संस्कृतीत रुढ असल्याचे दिसून येते. गोरैया , गोर आणि गोरमाटी यातील साम्य गोरमाटी व गोरबोलीच्या प्राचीनत्वाचे पुरावे देण्यास उपयुक्त ठरते.
बंजारा, लमाण, लम्बाडा, सुगाली यासारख्या अनेक नावांनी जगभरात ओळखल्या जाणाऱ्या " गोरबंजारा गणसमाज" हे पुर्वाश्रमीचे " गोर प्रांतातील" गोरमाटी च होत. कोणताही समाज ज्या भुभागात जो समाज वास्तव्यास असतो त्या भुभागावरुन त्याची ओळख समाजात होत असते. आजही एकेकाळी भारतखंडाचा भाग असलेल्या अफगाणिस्तानमध्ये गोर प्रांत, गोर पहाडी, मेहरगड , डोकरी रेल्वेस्थानक इत्यादी अस्तित्वात असलेल्या नावावरून एकेकाळी " गोरबंजारा" ही शासनकर्ती व गोर प्रांतात वास्तव्य करणारी जमात होती हे लक्षात येते. गोर, पणी, हारपणी, मेरसंग्या, नेरती, मेराम यासारखी नावात भौगोलिक सत्यता आढळून येते.
" गोरबोलीत" मानवी ध्वनीनिर्मीतीच्या अवयवांना असलेली नावे पक्ष्यावरून देण्यात आलेली आहे. ते सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. कागला (पडजीभ) , कोबली ( स्वरतंत्री) , टिटवा ( कंठद्वार) ही नावे अन्य भाषेच्या संदर्भात आढळत नाहीत. ध्वनी साठी "गोरबोली" त असलेला "ढाळ" शब्द जगातील कोणत्याही भाषेच्या शब्दकोशात सापडणे अशक्य आहे. " गोरबोली" बोलीभाषेच्या स्वतंत्र अस्तित्वाची ही खरी ओळख होय.
"गोर बंजारा संस्कृती" ही प्राचीन काळी मातृसत्ताक होती याचे अनेक पुरावे आजपर्यंत गोरगणात अस्तित्वात आहेत. वेतडूला (नवरदेव) नवलेरीच्या (नवरी) घरी लग्नानंतर काही काळ व्यतीत करावा लागे, नवरीला लग्नात वधूमुल्य देण्याची प्रथा, विवाहानंतर वर वधूला घेवून " तांगडी "परत जाताना वेतडू डोक्यावर पुर्ण तोंड उपरण्याने झाकायला लावतात. नवरदेवाला मंडपाच्या दारापाशी उभे करतात. नवरदेवाची सासू पाणी देवून नवरदेवाच्या तोंडावरील पदर उचलून डोक्यावर ठेवते. या प्रथा प्राचीन काळाचे मातृसत्ताक पद्धतीचे पुरावे देतात.
बोलीभाषा
या प्रमाण भाषेप्रमाणे व्याकरण अंगाने परिपुर्ण नसतात. असे काही भाषा तज्ञांचे मत आहे. पण हे सर्वथा चुक आहे. प्रमाणभाषेची निर्मितीच बोलीभाषेतून झालेली आहे. " गोरबोली" चा विचार केला तर ती व्याकरण दृष्टीने स्वयंसिद्ध आहे. हे भिमणीपुत्र मोहन नायक यांनी आपल्या " गोरमाटी बोलीभाषा व सामाजिक आविष्कार" या ग्रंथात सप्रमाण सिद्ध केले आहे. भाषा संप्रेषण, स्वनिम विचार, अलंकार, रुपक, उपमा या सर्व व्याकरण व्यवहारात रुढ असलेल्या संकल्पनाची " गोरबोली" त भरमार आहे. त्यामुळे भाषाशास्त्राच्या अभ्यासासाठी परिपूर्ण आहे. पण आजपर्यंत त्यांचा सांगोपांग अभ्यास केला गेला नाही. भविष्यात जर " गोरबोली" चा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास केला गेला तर निश्चितपणे " सिंधू संस्कृतीच्या" अज्ञात असलेल्या भाषेच्या मुळापर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असे मत भाषातज्ञ भिमणीपुत्र मानतात.
किशोर आत्माराम नायक
गोर बंजारा संस्कृती
संदर्भ:- गोरमाटी बोलीभाषेचे सामाजिक आविष्कार
आणि लोकजीवन.. भिमणीपुत्र मोहन नायक
Super
उत्तर द्याहटवा