गोर बंजारा तांडा संघटन " हासाबी, नसाबी, डायसाणं" Gor Banjara Tanda system "HASABI, NASABI, DAYSANN"
गोर बंजारा तांडा संघटन
हासाबी, नसाबी, डायसाणं
" तांडा " पंचमंडळामध्ये ' नायक, कारभारी ' सोबत महत्वाची भुमिका बजावणारे सदस्य म्हणजेच हासाबी, नसाबी, डायसाणे होत. या पाच लोकांच्या समुहाला " पंच "म्हणतात.कोणत्याही प्रसंगी निर्णय घेताना नायक या लोकांच्या सल्यानेच निर्णायाप्रत पोहचत असतो. एखाद्या बिकट प्रसंग, वादविवाद वा नवरा बायकोतील वाद ' मामलो' जर नायकाच्या दरबारात न्याय मागण्यासाठी आला तर अशा वेळी नायक बैठकीचे आयोजन करतो. याला " नसाब " असे म्हणतात. यावेळी तांड्यातील समजदार, न्यायप्रिय नसाबी व्यक्तीला पंचमंडळामध्ये स्थान मिळते. तांड्यातील वयोवृद्ध जाणकार व्यक्ती ज्यांना अनेक गोष्टींचा अनुभव आहे अशा डायसाण व्यक्तीला नायक पंचमंडळामध्ये घेतो. निष्पक्ष निर्णय व्हावा हा मुख्य उद्देश. अशा निवाड्याच्या वेळी रक्त संबंध तथा अर्थ संबंधीत व्यक्तीला पंचमंडळामध्ये घेण्याचे नायक टाळत असतो.
हासाबी
तांड्याच्या आर्थिक व्यवहार देखरेख करण्यासाठी " हासाबी" ची निवड करण्यात येते. सामान्यतः नायकाच्या मर्जीतील व्यक्तीच हे काम सांभाळत असतो. ' समनक, गेर, ओरी-बकरी ' अशा कार्यक्रमांचे वेळी बकरे विकत आणले जाते. अशावेळी तांड्यातील प्रत्येक कुटुंबाकडून विशिष्ट रक्कम वसूल करण्यात येते. काही वेळा योग्य रक्कम जमा झाली नाही तर नायक वा तांड्यातील आसामी कडून तात्पुरती उसनी घेतली जाते. नंतर यथावकाश ती रक्कम तांड्यातून जमा करून ज्याची त्याला परत करण्यात येते. अशावेळी " हासाबी" नायक कारभारीला योग्य सहकार्य करीत असतो.
विवाह प्रसंगी वर पक्षाकडून घेण्यात येणारा तांड्याचा " हासाब ", वादविवादात मिटविताना कोण्या एका पक्षाला केलेला " दण्ड" , तसेच तांड्यात विविध प्रसंगी जमा झालेल्या रक्कमेचा हिशोब ठेवण्याचे काम " हासाबी " करीत असतो. नायक आर्थिक व्यवहारापासून वेगळा राहण्याची भूमिका घेतो.
नसाबी
न्यायनिवाडा करतांना तांड्यातील साधारण व्यक्तीलाही नायक पंचमंडळामध्ये घेवू शकतो. त्यांच्या अंगी असणारे व्यवहारज्ञान, वाक्चातुर्य, निर्णयक्षमता इत्यादी गुणाची पारख करून अशा एक वा कधी दोन व्यक्तींची निवड नायक करीत असतो. " नसाबी" म्हणजेच न्यायनिवाडा याबाबत जाण असलेले व्यक्तिमत्त्व. नायक समुहाची प्रथमतः याबाबत सर्वसमावेशक मान्यता घेत असतो. ज्या व्यक्तीला " नसाबी" म्हणून नायकाने पाचारण केले. त्याला आपोआप समाजात मानाचे स्थान मिळते. सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे असे हे पद . " नसाब" च्या वेळी नायकाला जर वाटले तर इतर तांड्यातील नायकाला विनंती करून तेथील " नसाबी" व्यक्तीला आपल्या तांड्यात आमंत्रित करीत असतो. परिस्थिती नुसार नायक " नसाब " च्या वेळी जुन्याच व्यक्तीला पुन्हा पंचमंडळामध्ये घेतो. क्वचित प्रसंगी त्यात फेरबदलही करत असतो.
डायसाणं
" डायसाणं" म्हणजे तांड्यातील वृद्ध,जाणकार व्यक्ती. ज्याने अनेक लहानमोठ्या संकटाचा सामना केला आहे. विविध समस्यांवर वेळोवेळी योग्य असे मार्गदर्शन केले आहे. तांड्याच्या रुढी, परंपरा बाबत सखोल माहिती, ज्ञान आहे. अशा व्यक्तींना " डायसाणं" असे संबोधतात. तांडा नीतीनियमाचे पालन करून, रुढी परंपरा चा आदर करत जगावा अशी भावना जोपसणारी मंडळी. एक ते दोन व्यक्तीला नायक आदराने पंचमंडळामध्ये सामील करून घेतो. त्यांच्या ज्ञान व अनुभवाचा फायदा निर्णय देताना व्हावा हा मुख्य उद्देश. निष्पक्षपणे मत मांडण्याचा अशा व्यक्तींचा गुणवैशिष्ट असतो.
वरील सर्व घटक जसे नायक, कारभारी, हासाबी , नसाबी , डायसाणे मिळून तांड्यात पंचपंचायत बनत असते. क्लिष्ट विषयाच्या वादविवादात निर्णय देताना या मंडळाची कसोटी लागत असते. परंतु एखादा निर्णय सर्वोमुखी दिला गेला तर त्याला कोणत्याही परिस्थितीत विरोध करता येत नाही. विरोध केला तर तांड्यातून बहिष्कृत करणे किंवा दंण्ड करण्याचा प्रघात आहे.
आजच्या काळात " तांडा" च स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. तेथे हे जुने पंचमंडळ काय तग धरून राहील ? हा मोठा प्रश्न आहे. आज देशात मोठ्या गाजावाजा करून लागू करण्यात आलेली " तंटामुक्त गाव" हि संकल्पना हजारो वर्षांपासून तांड्यात रुजलेली आहे.. असेच नाही तर ही योजनाच तांड्याची देणगी आहे असे मत भिमणीपुत्र मोहन नायक मांडतात. तांडयाला त्याचे गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी " तांडा " च जर मनापासून झटला, झगडला तर येणाऱ्या काळात नव्या धोरणानुसार तांडा नवतरू झाल्याशिवाय राहणार नाही.
छान माहिती
उत्तर द्याहटवा